Pimpri News : ‘जया’ची राखेतून सुवर्ण भरारी; यशाला 50 अभ्यासक्रमांसह दोन विश्वविक्रमांचे कोंदण

एमपीसीन्यूज ( गोविंद बर्गे ) : खेळण्याबागडण्याच्या वयात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नशिबी आलेले मजुरीचे काम, वडिलांच्या आजारपणासाठी होणारा खर्च, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, अशा कठीण परिस्थितीवर मात करीत वयाच्या 35 वर्षांपर्यंत तब्बल विविध 50 शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करीत दोन विश्वविक्रमाला ( World Record) गवसणी घालण्याची किमया पिंपरी चिंचवड शहरातील सावित्रीच्या लेकीने सध्या केली आहे.

मराठीसह एकूण नऊ प्रादेशिक भाषांवर प्रभुत्व मिळवणाऱ्या या सावित्रीच्या लेकीला शैक्षणिक पदव्यांमध्ये जागतिक दर्जाच्या ‘लिम्का’ ( Limca) आणि ‘गिनेस’ (Guinness) या दोन विश्व विक्रमांची नोंद करायची आहे. त्याही पुढे जाऊन जागतिक पातळीवर महिलांमध्ये सर्वांत जास्त शैक्षणिक पदव्या मिळविण्याचे तिचे स्वप्न आहे.

ॲड. जया बाळकृष्ण उभे, असे या सावित्रीच्या लेकीचे नाव आहे. त्या पिंपरी येथील खराळवाडीत दहा बाय बाराच्या खोलीत राहतात.

आपल्या या विश्वविक्रमा विषयी आणि शिक्षणासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाबाबत माहिती देताना ॲड. जया उभे म्हणालया, बालपणापासून गरिबीचे असह्य चटके सहन करीत नोकरी करुन हे यश मिळविले आहे. माझे वडील प्लम्बर म्हणून बांधकाम क्षेत्रात काम करायचे, तर आई गृहिणी होती.

आई आणि वाडिल दोघांनाही आम्ही भावंडानी उच्च शिक्षित व्हावे, अशी इच्छा होती. यासाठी आईने कायमच भक्कम पाठबळ दिले. आईच्या पाठबळाशिवाय माझा विश्वविक्रमाचा प्रवास केवळ दिवास्वप्न ठरले असते.

इयत्ता सातवीत असताना वडिलांच्या मधुमेहाने डोके वर काढले. त्यांना डायलिसिस करावे लागत होते. त्यासाठी खूप पैसे खर्च व्हायचे. अशा कठीण प्रसंगी कुणाकडूनही आर्थिक मदत मिळत नव्हती. म्हणून आम्हा भावंडावर लहानपणी मजुरीचे काम करण्याची वेळ आली.

सकाळी शाळा आणि दुपारी एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी मजुरी, अशी तारेवरची कसरत करावी लागत होती. अन्य मुले शाळा सुटल्यानंतर खेळात मग्न असायची तर आम्ही मजुरीच्या कामात. डोळ्यातून अश्रू वाहायचे, पण नाईलाज होता.

मधुमेहाने वडिलांचे निधन झाले. त्यावेळी मी इयत्ता दहावीत होते. वडील गेल्याचे दुःख मोठे. मात्र, परिस्थितीचे भान राखत जिद्दीने दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाले. त्याचवेळी मराठी आणि इंग्रजी टायपिंग आणि शॉर्टहँडचे प्रशिक्षण घेऊन पार्ट टाइम नोकरीही सुरु केली. त्यामुळे थोडेफार पैसे येऊ लागले. यातून घर खर्चाला मदत करुन उर्वरित पैशाचा उपयोग शिक्षणासाठी केला.

बीए पूर्ण होईपर्यंत संगणकाचे अनेक कोर्स पूर्ण केले. महाविद्यलयीन शिक्षण पूर्ण करताना सलग तीन वर्ष केवळ माझ्याकडे केवळ दोनच ड्रेस होते.

पुढे ‘एलएलबी’साठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवीपर्यंत मराठीत शिक्षण झाले होते. आता कायद्याचा संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजीत होता. दडपण खूप होते. पहिल्या वर्षाची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. शिक्षण अर्धवट सोडावे लागणार होते.

मात्र, या संकटसमयी ॲड. रणदिवे यांनी पहिल्या वर्षाची फी भरली. पुढे पार्ट टाइम नोकरी करून त्यांचे पैसे परत केले.

एलएलबी करताना फी भरायला पैसे नव्हते, मग पुस्तके कुठून खरेदी करणार ?. दरम्यान , त्यावेळी महाविद्यालयातील लायब्ररीत श्री. लोखंडे यांची झाली. त्यांच्या ओळखीने लायब्ररीतून पुस्तके घ्यायची. गरजेच्या नोट्स काढून त्यांना पुस्तक परत करायचे . अशा अनेक संकटनांवर मात करीत एलएलबी पूर्ण केले.

त्यानंतर वकिलांकडे प्रॅक्टिस करू लागले. तेव्हा कुठे आर्थिक परिस्थिती सुधारली. तरीही शिक्षणात खंड पडू दिला नाही. नियमित व दूरस्थ पद्धतीने अनेक शैक्षणिक पदव्या संपादन केल्या. आजपर्यंत विविध 50  शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केले. यामध्ये डॉक्टरेट, बीए, एलएलबी, आठ विषयांमधून एमए, नऊ   पदव्या, 28  प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

यापैकी 48 अभ्याससक्रमांची जागतिक विक्रमासाठी नोंद केली. त्याची दाखल घेत ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड (OMG Book of Records)आणि जिनिअस बुक ऑफ रेकॉर्ड (Genius Book of Records) या दोन विश्वविक्रमांची नोंद झाली. याशिवाय मराठीसह हिंदी, इंग्रजी, संस्कृत, फारसी, उर्दू, तेलगू, कन्नड, गुजराती आदी भाषांच्याही पदव्या मिळविल्या.

लॉकडाऊनमध्ये बोरू आणि टाकने लिहिली भगवतगीता व मनाचे श्लोक

कोरोना महामारीच्या काळाला देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर घरी राहून बोरू आणि टाकच्या सहायाने मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेत  भगवतगीता आणि मनाचे शलोक लिहून काढले. या तिन्ही पुस्तकांचे प्रकाशन अद्याप बाकी आहे. तसेच माझ्या शिक्षणाला पाठबळ आणि प्रेरणा देणाऱ्या माझ्या आईविषयी ‘ माझ्या आठवणीतील आई’ या विषयावर पुस्तक लेखन सुरु आहे.

माझ्या वाट्याला आलेला संघर्ष इतर गरीब मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी परिसरातील गरजू आणि गरीब मुलांना मोफत शालेय पुस्तके भेट देत असते. शैक्षणिक बाबतीत मार्गदर्शन करणे, निराधारांना आर्थिक व गरजेचे साहित्य पुरविणे आदी सामाजिक कार्यसुद्धा करते. हे करत असताना प्रसिद्धीपासून कायम दूर राहते. कोरोनाकाळातील मदतीबद्दल सुमारे शंभर संस्थांनी ‘कोरोना योद्धा’ प्रमाणपत्र देऊन माझा गौरव केला आहे.

दोन्ही विश्वविक्रम आईला समर्पित

अतिशय खडतर परिस्थितीत मी माझे शिक्षण पूर्ण केले आणि 50 शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करुन दोन विश्वविक्रम केले. असे विक्रम करणारी मी पहिली महिला ठरली आहे. या सर्व यशात माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे. हे यश केवळ आईमुळेच मला मिळाले. दुर्दैवाने हे यश पहायला आज आई सोबत नाही. या दोन्ही विक्रमांची नोंद होण्यापूर्वीच आईने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे माझे दोन्ही विश्वविक्रम माझ्या आईला समर्पित केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.