Pimpri News : पत्रकार-पोलीस क्रिकेट सामना; पोलीस इलेव्हन संघाचा 38 धावांनी विजय

एमपीसी न्यूज – पत्रकार इलेव्हन विरुद्ध पोलीस इलेव्हन असा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना पार पडला. त्यामध्ये पोलीस संघाने 38 धावांनी विजय मिळवला. शनिवारी (दि. 28) टाटा कंपनीच्या मैदानावर हा सामना झाला.

पोलीस संघाचे कर्णधार अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे आणि पत्रकार संघाचे कर्णधार संदीप घिसे यांच्यासोबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नाणेफेक कवळी. पोलीस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पोलीस संघाकडून आयुक्त कृष्ण प्रकाश आणि पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मैदानात सेट होण्यापूर्वीच कुबडे झेलबाद झाले. पहिल्याच षटकात पोलीस संघाला धक्का बसला. मात्र ही कसर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भरून काढली. आयुक्तांनी 19 धावा काढल्या.

पोलीस आयुक्तांना रनआऊट करण्यात पत्रकार संघाला यश आले. पोलीस संघाचे सहायक आयुक्‍त सागर कवडे यांनी सर्वाधिक 25 धावा केल्या. त्यांच्या दमदार फलंदाजीने पोलीस संघात उत्साहाचे वातावरण आणले. पत्रकार नाझिम यांनी तीन षटकांत एक गडी, कैलास पुरी यांनी पोलीस संघाचे 2 षटकांत तीन गडी बाद केले. 12 षटकांच्या सामन्यात पोलीस संघाने 96 धावा काढल्या.

पोलीस संघाच्या 96 धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी पत्रकार संघाचे राजा गायकवाड आणि कृष्णा पांचाळ हे प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. कृष्ण प्रकाश यांनी तीन षटके टाकत दोन गडी बाद केले. तर पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी दोन षटकांत दोन गडी बाद केले. सहाय्यक आयुक्त सागर कवडे, प्रशांत अमृतकर यांनी पत्रकार संघाचा प्रत्येकी एक गडी बाद केला. सहायक आयुक्‍त प्रेरणा कट्टे यांनी देखील उत्कृष्ट गोलंदाजी केली. 97 धावांचा पाठलाग करताना पत्रकार संघाला 58 धावांमध्ये रोखण्यात पोलीस संघ यशस्वी झाला. सहाय्यक आयुक्त सागर कवडे आणि प्रशांत अमृतकर यांच्या जोडगोळीने पोलीस संघाचा विजयश्री आणण्यास दमदार कामगिरी केली.

पोलीस आयुक्‍त म्हणाले की, खेळामुळे ताणतणाव दूर होण्यास मदत होते. पोलीस आणि पत्रकारांमधील मैत्रीपूर्ण संबंध वृद्धींगत व्हावेत आणि दररोजचा कामाचा ताण कमी व्हावा, यासाठी हा क्रिकेटचा सामना घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.