Pimpri news: प्रशासनाचे अपयश आणि गलथानपणामुळे पत्रकार रायकर यांचा बळी – अमित गोरखे

सध्याच्या करोनाकाळात बातमीसाठी ठिकठिकाणी जाऊन लोकांना प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती देणारे पत्रकारसुद्धा करोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

एमपीसी न्यूज – सध्याच्या करोनाकाळात बातमीसाठी ठिकठिकाणी जाऊन लोकांना प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती देणारे पत्रकारसुद्धा करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच वृत्तवाहिनीने पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. प्रशासनाचे अपयश आणि गलथानपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केला आहे.

गोरखे म्हणाले, रायकर यांच्या निधनाच्या वृत्तामुळे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्राला धक्का बसला आहे.रायकर हे अतिशय संयत, शांत स्वभावाचे होते.

20 ऑगस्टला त्यांना थंडी ताप सुरू झाला होता, त्यानंतर रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. 27 ऑगस्टला त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यानंतर ते आपल्या गावी म्हणजे कोपरगावला गेले.

मात्र, त्यांना तिथेही त्रास जाणवत होता, त्यांनी कोपरगावातच एंटीजन टेस्ट केली आणि ती पॉझिटीव्ह आली. त्यानंतर त्यांना अँबुलन्सने पुण्यात आणण्यात आलं आणि जम्बो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

जम्बो रुग्णालयामध्ये ते अतिदक्षता विभागात होते, त्यांची प्रकृती खालावत होती. व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी आणि पत्रकारांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी हालचाली सुरू केल्या.

सुरुवातीला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून रुग्णवाहिका उपलब्ध आहे असं सांगण्यात आलं. पण नंतर त्यांना वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही.

सध्या सरकार प्रशासन आणि व्यवस्था यावरच काम करत असताना अशा पद्धतीने पत्रकारांंचे बळी जाणार असतील तर हे प्रशासनाचे अपयश आणि गलथानपणाच आहे, असे गोरखे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.