Pimpri news: पालकमंत्र्यांच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले- महापौरांचा आरोप

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या वतीने नेहरूनगर येथे उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शासन व ठेकेदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या या रुग्णालयातील नर्स व इतर स्टाफ यांना पगार देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना कोणतीही पूर्वसुचना न देता कामावरुन कमी केले आहे. त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोट्यवधीचा खर्च करुन सुध्दा कर्मचाऱ्यांचा पगार देणे सरकारला जमलेले नाही. या प्रकारास पालकमंत्री अजित पवार व राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातुन कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी व कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आण्णासाहेब मगर स्टेडीयम या ठिकाणी पालकमंत्र्याच्या पुढाकाराने राज्य शासन, पीएमआरडीए यांच्या माध्यमातुन जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आली.

या ठिकाणी पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णावर उपचार होत आहेत.

या जम्बो रुग्णालयाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले. उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री पवार यांनी सुचविल्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेने या जम्बो रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

तसेच ऑक्सीजन, आवश्यक औषधे, गोळ्या त्याचप्रमाणे सर्व भौतिक सुविधाही उपलब्ध करुन दिल्या. त्याचप्रमाणे या रुग्णालयावर नियंत्रणासाठी महापालिकेचे डॉक्टर व अधिकारीसुध्दा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या सुविधा महापालिकेने उपलब्ध करुन देवुन देखील जम्बो रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू आहे.

या रुग्णालयाच्या निविदेचे काम पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. त्यात राज्य सरकार व पीएमआरडीएचे लक्ष नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना नेमक कोण उघड्यावर सोडत आहे याचे गुपित उघड झालेले नाही.

मुळात महापालिकेच्या क्षेत्रातील कोविड रुग्णांबरोबरच हद्दीबाहेरील व ग्रामीण भागातील 40% रुग्णांवर मनपामार्फत उपचार केले आहेत. तसे पाहिले तर ही जबाबदारी राज्य शासनाची आहे.

असे असतानासुध्दा मानवतेच्या दृष्टीकोनोतुन पालिका ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देत आहे. तसे पाहता जिल्ह्याची कोरोना रुग्णांची परिस्थिती लक्षात घेवुन महापालिकेने शासनाला वारंवार सहकार्य केले आहे.

त्यामुळे शासनाने महापालिकेचा झालेला अधिकचा खर्च देवुन सहकार्य करणे अपेक्षित आहे. तथापि, असा निधी देणे दुरच मात्र जम्बो रुग्णालयातील ठेकेदार व प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची नाहक बदनामी होत आहे, असा आरोपही महापौर ढोरे व पक्षनेते ढाके यांनी केला आहे.

या भोंगळ कारभाराबाबत तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी व सुविधांचा अभाव यासंदर्भात महापौर ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज जम्बो रुग्णालयाची समक्ष पाहणी करुन माहीती घेतली. त्यावेळी कर्मचाऱ्यांना तातडीने पगार देणेबाबतच्या सूचना त्यांनी जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनास केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.