Pimpri News: पोलिसांना सापडत नसलेल्या ज्योत्स्ना शिंदे यांचा ई-मेलद्वारे पालिकेला रजेचा अर्ज

एमपीसी न्यूज – पोलिसांना सापडत नसलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी व पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी आज (शुक्रवारी) ई-मेलद्वारे महापालिकेला रजेचा अर्ज पाठविला आहे. वैद्यकीय रजेवर असल्याचे त्यांनी ई-मेल अर्जात म्हटले आहे. दरम्यान, प्राथमिक विभागाचा अतिरिक्त पदभार माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांच्याकडे देण्यात आला आहे.

शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता गायब झाल्याचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने गुरुवारी दिले होते. त्यानंतर ‘नॉट रिजेबल’ असलेल्या शिंदे यांनी आज (शुक्रवारी) ई-मेलद्वारे महापालिका प्रशासन विभागाकडे रजेचा अर्ज पाठविला.

पुणे जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यातील सर्व अधिकारी, संस्था चालक आणि शिक्षक यांचे जामीन अर्ज बुधवारी (दि. 27) पुण्यातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी फेटाळले आहेत.

आरोपींमध्ये महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांनी खोट्या व बनावट शिक्षकांना मान्यता दिल्या. गुन्हा दाखल झाल्यानंतरही मान्यता देण्यात आल्या. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पुन्हा फेरमान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

ज्योस्त्ना शिंदे या शुक्रवार (दि.22) पासून महापालिका कार्यालयात येत नव्हत्या. याबाबतची कोणतीही माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली नव्हती. काहीही न सांगता त्या गायब झाल्या होत्या. तसेच त्यांचा मोबाईल फोनही लागत नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी ई-मेलद्वारे पालिकेला रजेचा अर्ज पाठविला आहे. तसेच वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याचे अर्जात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.