Pimpri News: खडसे समर्थक भाजप महिला ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्षा सारिका पवार यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज – भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीवाशी झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राज्यातील समर्थकही भाजपचा त्याग करु लागले आहेत. पिंपरी-चिंचवड शहर भाजप महिला ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्षा सारिका पवार यांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘नाथाभाऊ माझे नेते आहेत. त्यांचा संघर्ष हा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भाजपचा राजीनामा देत आहे’, असे पवार यांनी म्हटले आहे.

भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे. भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या अध्यक्षा असलेल्या सारिका पवार या पक्षात अन्याय होत असल्याने 40 वर्षानंतर भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कट्टर समर्थक आहेत.

भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. भाजपच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा.

_MPC_DIR_MPU_II

शहरात भाजपची सत्ता नसताना पक्ष संघटनेत सदस्य नोंदणी, विविध आंदोलने, आरोग्य शिबिर, महिलांसाठी विविध प्रशिक्षणे आयोजित केले. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. पक्ष संघटना वाढविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले.

परंतु, 2017 च्या पालिका निवडणुकीत एकनाथ खडसे समर्थक असल्यामुळे माझी उमेदवारी कापली असा आरोपही त्यांनी केला. पालिकेत सत्ता आल्यानंतर पक्षाने कार्याची दखल घेतली नाही.

तसेच नाथाभाऊ माझे नेते आहेत. त्यांचा संघर्ष माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भाजपचा राजीनामा देत आहे, असे पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1