Pimpri News: औद्योगिकनगरीत खंडेनवमी उत्साहात; टाटा मोटर्समध्ये वाहनांची पूजा

एमपीसी न्यूज – औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व लघुउद्योगांमध्ये कामगारांनी आज (शनिवारी) पारंपरिक पद्धतीने यंत्रपूजन करून खंडेनवमी उत्साहात साजरी केली. टाटा मोटर्स प्रा. लि. कंपनीत खंडेनवमीनिमित्त वाहनांची पूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली.

औद्योगिकनगरीत दरवर्षी खंडेनवमी उत्साहात साजरी केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक कंपन्यांमध्ये सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात आला नाही. मात्र, उत्सवाची भावना कमी झालेली नव्हती.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचा कणा असलेल्या टाटा मोटर्स कंपनीत पारंपारिक पद्धतीने वाहनांचे पूजन करण्यात आले. टाटा मोटर्सचे संस्थापक जे. एन. टाटा, जेआरडी टाटा आणि सुमंत मूलगावकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

एक्सकॉमचे सदस्य गिरीश वाघ, राजेंद्र पेटकर, व्हीपी मॅन्युफॅक्चरिंग सीव्हीचे अजोय लाल, पीव्ही ऑपरेशनचे प्रमुख राजेश खत्री, कौशल्य विकास विभागाचे सीताराम कांदी, सीव्ही अँड पीव्हीचे प्रमुख आलोक सिंह, जयदीप देसाई, एसएचई विभागाचे डॉ. अरुण काळे, एचआर सीव्हीबीयूचे सरफराज मनेर, रवी कुलकर्णी, एचआर पीव्हीबीयूचे गौरीशंकर पात्रा उपस्थित होते. टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन (टीएमईयू) चे अध्यक्ष सचिन लांडगे, कार्यकारी अध्यक्ष अशोक माने, सरचिटणीस संतोष दळवी आणि कोषाध्यक्ष अबिदाली सय्यद यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, पिंपरी, चिंचवड, भोसरी, तसेच चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व लघुउद्योगांमध्ये कामगारांनी पारंपरिक पद्धतीने यंत्रपूजन करून खंडेनवमी उत्साहात साजरी केली.

शहरात सुमारे साडेसहा हजार लहान-मोठे उद्योग आहेत. खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रांचे पूजन करण्याची परंपरा आहे. सर्वच लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये यंत्रांची पूजा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III