Pimpri News : किसान आंदोलन हे देशाविरोधात युद्ध – सुरेश चव्हाणके

एमपीसी न्यूज – ‘शेतकर्‍यांंसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. सरकार व पोलीसही काही करू शकले नाहीत. या आंदोलनात तलवार आणि इतर हत्यारांचा देखील उपयोग झाला, देशविरोधी नारे देण्यात आले. किसान आंदोलन हे आंदोलन नसून देश विरोधातील एक युध्द आहे’, असा आरोप सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी केला.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज रविवारी (दि.31) ‘चर्चा हिंदू राष्ट्र की’ या कार्यक्रमात ‘किसान आंदोलन, या देशविरोधी षडयंत्र ?’ हा ऑनलाईन परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात ते बोलत होते.

चव्हाणके पुढे म्हणाले, किसान आंदोलनाला युध्द न म्हणता ‘लोकतांत्रिक आंदोलन’ म्हटले जात आहे. या आंदोलनात असे काय नाही झाले, ज्याला आपण अनैतिक आणि कायद्याच्या विरोधात आहे असे म्हणू ? मात्र, यात सहभागी असलेल्यांनी याला कायद्याच्या चौकटीत बसवले आहे. या आंदोलनाने देशातील लोकतंत्राचा दुरूपयोग केला असल्याचे चव्हाणके म्हणाले.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे म्हणाले, शेतकर्‍यांंच्या आंदोलनाविषयी शेतकरीच बोलतील, असा प्रचार सध्या काही राजकीय नेते आणि तथाकथित विचारवंत करत आहेत. हे शेतकरी आहेत का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आगरा येथील ‘इंडिक अकॅडमी’चे समन्वयक विकास सारस्वत म्हणाले, ‘सध्या सुरू असलेले किसान आंदोलन हे सीएए, एनआरसी प्रमाणे कुठलाही विशिष्ट मुद्दा न पकडता दगडफेक, पोलिसांना मारहाण व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करून केले जात आहे. त्यांनी 26 जानेवारीला केलेले आंदोलन हा ‘विद्रोह’ नाही, तर ‘राजद्रोह’ होता. जे समूह या आंदोलनात जोडले आहेत, त्यांचा वेगळ्या कारणांसाठी वापर केला जात असल्याचे सारस्वत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.