Pimpri news: ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण वाढू लागल्याने इंजेक्शनचा तुटवडा

एमपीसी न्यूज – कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य असलेल्या म्युकरमायकोसिस आजाराची लागण होत असून या रुग्णांना लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी हे इंजेक्शन दिले जाते. परंतु, सद्यस्थितीत हे इंजेक्शन आणि इतर औषधे मिळणे कठीण झाले आहे. त्याचा मोठा तुटवडा जाणवत आहे. महापालिकेच्या वायसीएम खासगी रुग्णालयात देखील इंजेक्शनची कमतरता आहे. रुग्णांच्या संख्येनुसार इंजेक्शनचा पुरवठा अतिशय नगण्य होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत.

सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात म्युकरमायकोसिस या आजाराचे 85 हून अधिक रुग्ण आहेत. तर या आजाराने 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात वायसीएम रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. वायसीएम रुग्णालयात दिवसाला जवळपास चार रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. वायसीएम रुग्णालयात सध्या औषधाचा साठा आहे. पण, वायसीएमलाही इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे.

खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी हे इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात म्युकरमायकोसिसचे रुग्ण शहरात वाढले तर इंजेक्शन आणि औषधांची टंचाई निर्माण होणार आहे. मेडिकल दुकानात देखील हे इंजेक्शन मिळत नसल्याची स्थिती आहे. आगामी काळात औषधांचा साठा उपलब्ध न झाल्यास रेमडेसिवीर प्रमाणे या इंजेक्शनचा काळ बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने बाधित असलेले सर्व रुग्ण कोरोनाचे आहेत. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणे होती. डिस्चार्ज झाल्यानंतरही काही दिवस गोळ्या, औषधे सुरु ठेवणे आवश्यक आहे. ही औषधे योग्य पद्धतीने न घेतल्यास हा आजार उद्भवतो. रक्ताच्या गाठी तयार झाल्यास आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने बुरशी डोके वर काढते. शरीरातील कमकुवत झालेल्या भागाला बुरशी लागते. बुरशीचा तोंड, नाकातून शरीरात प्रवेश होतो. शरीराचा कमकुवत भाग म्हणजे चेहरा असतो.

नाकाच्या बाजुची पोकळी, डोळा कमकुवत असते. त्याच्यातून बुरशी शरीरात जाते. उपचाराचे साईट इफेक्टसही होत असतात. मधुमेह असेल तर साखरेचे प्रमाण जास्त झालेले असते. अशा ठिकाणी बुरशी लगेच पसरते.त्यामुळे लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्याने उपचार घ्यावेत.

शहरातील काही मेडिकल आणि औषध पुरविणाऱ्याना विचारले असता, त्यांनी सांगितले की अचानक मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. तरी कशी ठिकाणी औषधी मिळत आहेत. परंतु रुग्ण वाढल्यास तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्युकरमायकोसिसचे 85 हून अधिक रुग्ण आढळून आलेत. परिणामी, औषधांची मागणी वाढली. परंतु त्या तुलनेत पुरवठा कमी आहे.

एका रुग्णाला लागतात 27 ते 30 डोस

म्युकरमायकोसिसच्या एका रुग्णाला लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचे साधारण 27 ते 30 डोस लागतात. रुग्णाची प्रकृती पाहून किती डोस द्यायचे हा निर्णय डॉक्टर घेतात. एखाद्या रुग्णाला या पेक्षा जास्त डोस लागू शकतात.

याबाबत बोलताना वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनची रविवारी 240 मागणी दिली होती. पण, 52 इंजेक्शन मिळाले आहेत. सध्या वायसीएम रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे 45 ते 50 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंतची रुग्णसंख्या 85 च्या पुढे गेली आहे.

लक्षणे

तीव्र डोकेदुःखी, अंगात सतत बारीक ताप असणे
गालावर सूज किंवा बधिरपणा येणे
नाक गळणे
वाचा जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे
वरच्या जबड्यातील दातांचे हलणे
जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे
वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.