Pimpri News: पालिका भवनाजवळील, वल्लभनगर येथील जागा पुणे मेट्रोला देणार

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोला विद्युत व अन्य कामांसाठी महापालिका भवनाजवळील 194 चौरस फूट व वल्लभनगर येथील 23 हजार 425 चौरस फूट क्षेत्रफळ जागा 30 वर्षे भाडेतत्वावर दिली जाणार आहे. त्यापोटी दोन कोटी 99 लाख 96 हजार 763 रुपये भाडे अपेक्षित आहे.

पुणे मेट्रोचा एक मार्ग पिंपरी-चिंचवड शहरात आहे. दापोडीतील हॅरिस पुलापासून पिंपरीतील मोरवाडी चौक एम्पायर इस्टेट सोसायटीजवळील संत मदर तेरेसा पुलापर्यंत मेट्रो मार्ग आहे. या अंतरात मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्थानक उभारण्याचे कामही पुर्णत्वाकडे आहे. त्यासाठी महापालिकेने महामेट्रोला वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा दिलेल्या आहेत. आतापर्यंत सात ठिकाणच्या जागा मेट्रोने ताब्यात घेतल्या आहेत.

मेट्रोला विद्युत पुरवठा करण्यासाठी वल्लभनगर येथे सब स्टेशन उभारण्यात आले आहे. तसेच, विद्युत विषयक आणखी जागा मेट्रोला हवी आहे. त्यासाठी वल्लभनगर एसटी आगारातील 23 हजार 425 चौरस फूट जागा दिली जाणार आहे. त्या ठिकाणी विद्युत रोहित्र, आरएमयू संच बांधणी केली जाणार आहे. या जागेचा भाडे दर एक हजार 265 रुपये चौरस फूट आहे. त्याचे 30 वर्षांचे भाडे दोन कोटी 96 लाख 32 हजार 625 रुपये होते.

महापालिका भवनाच्या आवारातील 194 चौरस फुट जागेवर मेट्रो विद्युत रोहित्र बसविणार आहे. या जागेचा भाडे दर एक हजार 877 रुपये चौरस फूट आहे. त्यानुसार 30 वर्षांसाठी तीन लाख 64 हजार 138 रुपये भाडे होते. तसेच, मेट्रो प्रकल्पात महापालिकेचा एकूण आर्थिक हिस्सा 286 कोटी 70 लाख रुपये आहे. त्यापैकी जागेचा हिस्सा 182 कोटी 60 लाख रुपये आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.