Pimpri News: रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करा; अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन बंद

एमपीसी न्यूज – राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व अंत्‍योदय अन्‍न  योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्‍यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्‍याच्‍या केंद्र शासनाच्‍या सूचना आहेत. त्यानुसार 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्‍येक रेशनकार्डमधील लाभार्थ्‍यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्‍याच्‍या उद्दीष्‍टाने पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील 11 परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविण्यात येत आहे. रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक करावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण विभागाने केले आहे.

राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व अंत्‍योदय अन्‍नयोजनेचे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एकुण 13 लाख 32 हजार 871 इतके लाभार्थी असून 10 लाख 61 हजार 822 ( 79.66%) इतक्‍या लाभार्थ्‍यांचे आधार सिडींग झालेले आहे. सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत अधिक पारदर्शकता येण्‍यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्‍यांचे आधार, मोबाईल सिडींग सुधारणे आवश्‍यक आहे.

याकरीता रास्‍तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील eKYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविणे आवश्‍यक आहे.

याकरिता 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्‍येक रेशनकार्डमधील लाभार्थ्‍यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्‍याच्‍या उद्दीष्‍टाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 11 परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविण्यात येत आहे.

त्‍याअनुषंगाने धान्‍याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्‍दारे रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्‍यांच्‍या आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्‍यात येणार आहे. याबाबत आधार सिडींग न झालेल्‍या लाभार्थ्‍यांची रास्‍तभाव दुकाननिहाय यादी तयार करण्यात आलेली आहे.

31 जानेवारी 2021 पूर्वी या लाभार्थ्‍यांचे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग करण्‍याचे निर्देश 11 परिमंडळ कार्यालयांना देण्यात आले आहेत.

eKYC पडताळणी व मोबाईल सिडींग सुविधा प्रत्‍येक रास्‍तभाव धान्‍य दुकानात व संबंधित परिमंडळ कार्यालयात उपलब्‍ध आहेत. याबाबत 28 डिसेंबर 2020 रोजी सर्व परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत रास्‍तभाव दुकानदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

रेशनकार्डमध्‍ये नोंद असलेल्‍या कुटुंबातील सर्व सदस्‍यांचे आधारकार्ड घेऊन संबंधित रास्‍तभाव धान्‍य दुकानात जावुन eKYC पडताळणी पूर्ण करुन घ्‍यावी. याकरिता संबंधित लाभार्थी यांनी वैयक्तिकरित्‍या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठ्याचा ठसा POS मशिनवर द्यावयाचा आहे.

eKYC करताना कुंटुंबातील किमान एका सदस्‍याचा चालू मोबाईल क्रमांक देणे आवश्‍यक आहे. eKYC 31 जानेवारी 2021 पर्यंत करुन घेणे बंधनकारक असून 31 जानेवारी 2021 पर्यंत आधारसिडींग न झालेस सदर लाभार्थ्‍यांना अनुज्ञेय धान्‍य पुढील महिन्‍यापासून निलंबित करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्‍यावी, असे अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.