Pimpri News : लॉकडाऊनचा निर्णय आत्मघातकी ठरेल – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला काहीजण कोरोनाची दुसरी लाट म्हणत आहेत. परंतु, लाट म्हणण्यासारखी सध्या राज्यात परिस्थिती नाही. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनचा निर्णय आत्मघातकी ठरेल. लॉकडाऊनमुळे बेकारी, चोरी, बेरोजगारी, आत्महत्यांची संख्या वाढेल, अशी भिती माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत प्रदीप नाईक यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांना नुकतेच निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासन गरीब वर्गावर लॉकडाऊन लादत आहे. आधीच महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खाद्य तेल 160 रुपये प्रतिकिलो झाले आहे. गृहिणींनी स्वयंपाक कसा करावा? रिक्षाचालक, मोलकरीण वर्ग, फेरीवाले, मजूर यांचा दिवसाचा रोजगार शे – दीडशे रुपये आहे. त्यांनी कसे जगायचे? असा प्रश्न नाईक यांनी आपल्या निवेदनात उपस्थित केला आहे.

लॉकडाऊनच्या निर्णयापेक्षा मास्क वापर सक्तीचा करावा. मास्क न वापरल्यास आर्थिक दंड व कैद अशी तरतूद करावी. कोरोना चाचण्यांचा वेग वाढविणे, सॅनिटायझरचा वापर, गर्दीवर बंधनं, रुग्णालयांची संख्या वाढविणे असे उपाय उचित ठरतील. लसीकरण सुरू झालं आहे. त्याचे महत्व पटवून लस घेण्याचं आवाहन करा, असे नाईक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.