Pimpri News : ‘लॉकडाऊन ठीक आहे, पण विकासकामाचे काय ?’

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचा जिल्हा प्रशासनाला सवाल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र असल्याचे म्हटले जातं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केला आहे. पण, विकासकामे होताना दिसत नाहीत. राज्याचा, जिल्ह्याचा तसेच शहराचा विकास ठप्प का आहे? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, आमदार, खासदारांना विकासकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण, उपलब्ध झालेल्या निधीपैकी किती निधी विकासकामावर खर्च झाला, हे पाहणं देखील महत्वाचे आहे.

शहरात समस्यांची कमतरता नाही. नदी पात्रात वाढलेली जलपर्णी, त्यामुळे नागरिकांना होणारा डासांचा त्रास, रस्त्यांची झालेली दुरवस्था, त्यामुळे होणारे अपघात, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जास्त क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधणे, इत्यादी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे असे नाईक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

जनता वेगवेगळे कर भरते. पाणी पट्टी, घरपट्टी, व्यवसाय कर, मालमत्ता कर, जी. एस. टी., वाहन कर इत्यादी. या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत पैसा जमा होतो. हा पैसा जनतेच्या घामाचा पैसा असून, तो जनतेच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे असे मत नाईक यांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.