Pimpri news: अभियंत्यांच्या नजरेतून बघा उद्योगनगरी! (व्हिडीओ)

व्हिडीओच्या माध्यमातून शहरातील झालेली, होत असलेली विकासकामे शहरवासीयांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – अभियंता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशन आणि महापालिकेने शहरातील पायाभूत सुविधांची आणि सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देणारे अप्रतिम गीत तयार केले आहे. या चित्रफितीचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते अभियंता दिनी उद्घाटन करण्यात आले.

या गीतामध्ये भोसरी, लांडेवाडीतील शिवसृष्टी, केएसीबी चौकातील शाहूसृष्टी, पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, थेरगाव पूल, जगताप डेअरी चौक, देहू-आळंदी बीआरटीरोड, टेल्को रोड, केएसीबी पूल, ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, नवीन जिजामाता हॉस्पिटल, पवना नदी, थेरगाव बोट क्लब उद्यान, भक्ती-शक्ती शिल्प समूह, तीन मजली नवीन पुलाचे सुरू असलेले काम, चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, घरकुल प्रकल्प, हॉकी पॉलिग्रास मैदान, महात्मा ज्योतिबा फुले पूल, नाशिक फाटा येथील भारतरत्न जे.आर.डी टाटा उड्डाणपूल, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील हॅरीस पूल,एम्पायर इस्टेट, चिंचवडगावातील चापेकर स्मारक, दिघी-आळंदी बीआरटी रोड, इलेक्ट्रॉनिक पोल, सोलर पॅनल, निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राचे चित्रिकरण केले आहे.

याबाबत उपअभियंता, प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, महापालिका स्थापत्य विभाग शहरवासियांसाठी विविध पायाभूत सुविधा विकसित करते. या सुविधा दर्जेदार करण्याकरिता आमचा नेहमीच प्रयत्न असतो. विकासकामाच्या माध्यमातून शहराचा कायापालट होत आहे.  यामुळेच नियोजनबद्ध विकसित शहरात आपल्या पिंपरी-चिंचवडची गणना होते. या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराला बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारने अभियंत्यांच्या कामाची दखल घेतली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. व्हिडीओच्या माध्यमातून शहरातील झालेली, होत असलेली विकासकामे शहरवासीयांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे मोठे सहकार्य लाभले.

अभियंता शान शहराची!!!

अभियंता शान शहराची हे गीताचे बोल आहेत. अथक परिश्रमातून अन् ध्यासातून पावन ज्ञानगंगेतून भिजून… यंत्रतंत्राच्या सह्यायने ताकद झाहला विकासाची…अभियंता शान शहराची…अभियंता शान शहराची..!

इमारती, पूल, रस्ते बांधिले… हिरवाईने शहर नटविले.. भक्ती-शक्ती शिल्प हे खास भूषविते ओळख शहराची…बीआरटी, मेट्रो पर्यावरणाचे रक्षण बुहुरूपी…ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क मान उंचविते नगरीची अभियंता शान शहराची…अभियंता शान शहराची..!

स्मार्ट सिटीच्या हाती हात, संगणकाची सुयोग्य साथ..वीज योजनेचा अभिवन उपक्रम, ऊर्जा बचतीने केली शहराची भरभराट अन सुविधांचा दिला थाट..सदैव तत्पर आपत्तीत सेवा करतो देशाची..अभियंता शान शहराची…अभियंता शान शहराची..! असे हे अप्रतिम गीत आहे.

अभियंता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशन आणि पालिकेने शहरातील विकासकामांची माहिती देणारे अप्रतिम गीत बनवून घेतले आहे.

हे गीत  सुरेखा कुलकर्णी यांनी तयार केले. तेजस चव्हाण यांनी संगीत दिले असून अक्षय घाणेकर यांनी गीताचे गायन केले. तर, देवदत्त कशाळीकर यांनी ड्रोन कॅमे-याद्वारे चित्रिकरण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.