Pimpri news: चंद्रकांत पाटील यांच्या मुळेच पुणे मतदारसंघातील पदवीधरांचे नुकसान – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदारसंघाचे तब्बल 11 वर्षे प्रतिनिधित्व करणार्‍या चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील पदवीधरांचा एकही प्रश्न सोडविला नाही. राज्यात सरकार असतानाही पदवीधरांकडे दुर्लक्ष करणार्‍या पाटलांना आता निवडणुकीमध्ये पदवीधरांची आठवण झाली आहे. त्यांच्यामुळेच पदवीधरांचे नुकसान झाल्याचा पलटवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार केला. या दरम्यान पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.

राज्य सरकारचा उल्लेख करंटा असा करतानाच महाविकास आघाडीमुळे पदवीधरांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. पाटील यांच्या टीकेला संजोग वाघेरे यांनी उत्तर दिले आहे.

वाघेरे म्हणाले, सहा वर्षांच्या दोन टर्ममध्ये चंद्रकांत पाटील यांना पदवीधरांनी संधी दिली. मात्र, त्यांनी पदवीधरांचा एकही प्रश्न सोडविला नाही. अकरा वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात पदवीधरांसाठी काय केले हे त्यांनी अगोदर जाहीर करावे.

केवळ खोटे बोलण्यात आणि टीका करण्यात माहिर असलेले चंद्रकांत पाटील हे राज्यात भाजपाचे सरकार असताना याच पदवीधरांच्या आशीर्वादामुळे पाच वर्षे मंत्री होते. परंतु, आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात पदवीधरांसाठी काहीही न करणार्‍या पाटील यांना आता पदवीधरांचे प्रश्न आठवू लागले आहेत.

आपले अपयश लपविण्यासाठी ते महाविकास आघाडीवर टीका करत असून त्यांच्या टिकेला आता कोणीही गांभीर्याने घेत नाही. 1 डिसेंबर रोजी पदवीधर आपला रोष मतपेटीतून व्यक्त करतील आणि चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जागा दाखवून देतील, असेही वाघेरे यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.