Pimpri News: पंतप्रधान आवास योजनेच्या 3664 सदनिकांसाठी सोमवारी सोडत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांसाठी येत्या सोमवारी (दि.11) सोडत काढली जाणार आहे. तीनही प्रकल्पातील 3664 सदनिकांची संगणकीकृत सोडत काढण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही सोडत काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. च-होली, रावेत आणि बो-हाडेवस्ती येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे.

यासाठी महापालिकेने अर्ज मागविले होते. एकूण 47 हजार 878 अर्ज आले होते. त्यापैकी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले आहेत.

च-होतील 1442 सदनिका, रावेतमध्ये 934 आणि बो-हाडेवाडीत 1288 अशा एकूण 3664 सदनिका असणार आहेत. च-होलीतील प्रकल्पाचे काम 15 टक्के, बो-हाडेवाडीतील प्रकल्पाचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. दीड वर्षात काम पूर्ण होईल असा प्रशासनाचा दावा आहे.

तर, रावेत येथील गृह प्रकल्पाच्या कामाला अद्याप सुरुवातही झाली नाही. जागेचा न्यायालयात वाद सुरु आहे.

या योजनेकरिता 3664 सदनिकेची निवड यादी, त्याच प्रमाणात प्रतिक्षा यादी करण्यात येणार आहे. सदनिका धारकास प्रथमत: 10 टक्के स्वहिस्सा भरावा लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.