Pimpri News: भाजपची राष्ट्रवादीवर कुरघोडी !, ”आवास योजने’ची सोडत केंद्रीय शहरी विकासमंत्र्यांच्या हस्ते काढा’

महापौर उषा ढोरे यांचे आयुक्तांना पत्र ;

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांच्या सोडत कार्यक्रमांच्या राजशिष्टाचारावरुन आकांडतांडव करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी भाजपनेही आता कुरघोडी केली आहे. आवास योजनेत केंद्र सरकारचाही आर्थिक हिस्सा आहे. त्यामुळे या सदनिकांची सोडत केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते काढावी, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांना केली आहे.

याबाबत महापौर ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी पत्रव्यवहार करावा. त्यांची वेळ घेवून त्यांच्या हस्ते सदनिकांची सोडत काढावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात ही आवास योजना राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी 3664 सदनिका बांधण्यात येत आहेत.

या सदनिकांची सोडत सोमवारी (दि.11) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होती. परंतु, राजशिष्टाचारानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत काढण्याची मागणी राष्ट्रवादीने केली. त्यासाठी सोडतीदिवशी राष्ट्रवादीने आंदोलन केले.

ऐनवेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोडत रद्द केल्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्ताधारी भाजपने आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करत राज्य सरकारच्या दबावमुळेच आयुक्तांनी ऐनवेळी सोडत रद्द केल्याचा आरोप केला होता.

विकास कामांसाठी राज्य सरकारने निधी दिला असल्यास त्यांच्या प्रतिनिधीला कार्यक्रमासाठी बोलविणे अपेक्षित असते. पत्रिकेत नाव घातले म्हणजे निमंत्रण दिले असे होत नाही. त्यांची वेळ घ्यावी लागते. या प्रकरणात राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याने कार्यक्रम रद्द केल्याची कबुली आयुक्त हर्डीकर यांनी दिली होती.

तसेच शहरातील जनता, लोकप्रतिनिधींची आयुक्तांनी माफीही मागतिली होती. राष्ट्रवादीने आमच्या आंदोलनाला यश आल्याचे सांगत भाजपला राजशिष्टाचार कळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांपासून राष्ट्रवादी-भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

आता राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी भाजपनेही कुरघोडी केली आहे. आवास योजनेतील च-होली, बो-हाडेवाडी, रावेत येथील गृहप्रकल्पात केंद्र सरकारनेही आर्थिक भार उचलला आहे. त्यामुळे या सदनिकांची सोडत केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते काढावी. त्यासाठी त्यांची वेळ घ्यावी, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांना केली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”आवास योजनेची सोडत केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते काढावी, अशी सूचना करणारे महापौरांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री पुरी यांची वेळ घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन पत्रव्यवहार केला जाईल. त्यांची वेळ घेतली जाईल”.

भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण !

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंर्तगत (जेएनयूआरएम) शहरात मोठे गृहप्रकल्प बांधले आहेत. या सदनिकांच्या चाव्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री शैलाजा कुमारी या शहरात आल्या होत्या. पंतप्रधान आवास योजनेत केंद्र सरकारचा हिस्सा आहे. हे अगोदरपासूनच भाजपला माहिती आहे.

त्यामुळे सुरुवातीलाच केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सोडत काढण्याचे नियोजन करणे आवश्यक होते. पण, राजशिष्टाचारामुळे सोडत रद्द केल्याने राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना बोलविले जात आहे. त्यामुळे भाजपला हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे बोलले जात आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.