Pimpri News : स्मार्ट सिटीची कामे करणाऱ्या ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंपनीला 50 हजारांचा दंड

एमपीसी न्यूज – अत्यावश्यक काम असल्याने पावसाळ्यातही खोदाईस परवानगी दिल्यानंतर अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याने स्मार्ट सिटीतील कामे करणाऱ्या लॉर्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एल अ‍ॅण्ड टी) या कंपनीला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच यापुढे काम करताना परवानगी दिलेल्या पत्रातील अटी व शर्तीचे पालन करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. एल अ‍ॅन्ड टी कंपनीसोबत 25 जानेवारी 2019 रोजी करारनामा झाला असून त्यांना कामाचा आदेश देण्यात आला आहे. सिटी फायबर नेटवर्क फॉर कोअर, अ‍ॅग्रीशन अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेस लेअर, वायफाय, सीसीटीव्ही, पोल बसविण्याचे नियोजन आहे. या कामासाठी रस्ता व फुटपाथ खोदाई करावी लागणार होती. कोअर (गाभा) आणि अ‍ॅग्रीशनसाठी (एकत्रीकरण) करण्यात येणा-या रस्ता खोदाईस पावसाळ्यातही परवानगी देण्यात आली होती.

काम अत्यावश्यक असल्याने आणि रस्ता व फुटपाथ खोदाई केल्यानंतर रिस्टोरेशन (रस्ता व फुटपाथ पूर्ववत) करणे. वाहतूक सुरळीत करण्याची हमी कंपनीने दिली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोअर नेटवर्क पूर्ण करण्यासाठी 3.50 किलो मीटर आणि अ‍ॅग्रीशन लेअरच्या 6.80 किलो मीटरसाठी पावसाळ्यात रस्ते खोदाईस अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात आली होती. परंतु, 21 ऑगस्ट 2020 रोजी शंकरनगर ते ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत काम सुरु असताना प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी पत्रातील अटी शर्तीनुसार काम करण्यात येत नसल्याचे आढळून आले.

सुरक्षतेच्या दृष्टीने (वाहतूक वळविण्याबाबतचा फलक, संपूर्ण खोदकामाभोवती लोखंडी कडे, वाहतूक सावधनतेचा फलक) कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. तसेच खोदकामाबाबत वाहतूक विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र जागेवर आढळून आले नाही. याबाबतचा खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या असतानाही एल अ‍ॅण्ड टी कंपनीने खुलासा केला नाही. त्यामुळे अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांनी ही कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III