Pimpri News : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचा होत आहे कायापालट, नूतनीकरणाचे काम अंतिम टप्यात

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचा कायापालट होत आहे. या पॉलिग्रास हॉकी मैदानाचे 28 वर्षानंतर नूतनीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. नूतनीकरणाचे काम अंतिम टप्यात असून, आसन व्यवस्थेवर छत बसवण्यात आले आहे, पॉलिग्रास टर्फ बसवण्यासाठी डांबरीकरणाचा बेस तयार करण्यात आला आहे तसेच, सुरू असलेल्या रंगरंगोटीमुळे मैदानाचे रुपडे पालटत आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत मैदानाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मैदानातील प्रेक्षक गॅलरीला कव्हर बसवण्यात आले आहेत, रंगरंगोटीचे काम अंतिम टप्यात आहे. मैदानावर डांबरीकरणाचा बेस तयार करण्यात आला असून, येत्या दोन दिवसात पॉलिग्रास बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नवीन वर्षापासून मैदान खुले करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ‘ह’ क्षेत्रिय स्थापत्य विभाग अभियंता धनंजय गवळी यांनी सांगितले.

मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी मैदानाची टर्फ जागोजागी फाटली होती. त्याचा फटका खेळाडूंना बसत होता. अनेक खेळाडूंना दुखापती झाल्या. फाटलेली टर्फ बदलण्यात यावी अशी मागणी खेळाडू करत होते. त्यानुसार पॉलिग्रास टर्फ बदलण्याचे काम सुरू आहे. मनपा क्षेत्रातील खेळाडूंना याचा फायदा होणार आहे. 2019 मध्ये पालिकेने हे मैदान भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार विक्रम पिल्ले यांच्या अकादमीला चालवण्यास दिले आहे. येणा-या अनेक खेळाडूंना या मैदानाचा फायदा होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.