Pimpri YCMH News: वायसीएमएचसाठी आणखी एक प्लाझ्मा मशिन तातडीने उपलब्ध करून द्या – तुषार हिंगे

यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील रक्तपेढीत प्लाझ्मा मशिन एकच असल्याने दिवसाला केवळ 5 ते 6 दात्यांकडून प्लाझ्मा घेता येतो. : Make another plasma machine available immediately for YCMH - Tushar Hinge

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती लाभदायक ठरत आहे. मात्र, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील रक्तपेढीत प्लाझ्मा मशिन एकच असल्याने दिवसाला केवळ 5 ते 6 दात्यांकडून प्लाझ्मा घेता येतो. अनेक इच्छुक प्लाझ्मा दात्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी वायसीएम रूग्णालयात आणखी एक प्लाझ्मा मशिन तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी सोमवारी (दि.17) चर्चा करून वरील सूचना केल्या आहेत.

उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, आजअखेर शहरातून तब्बल 25 हजार कोरोनाबाधित ठणठणीत बरे झाले आहेत. कोरोनातून बरे झालेले विशेषत: तरूणांकडून प्लाझ्मा दान घेतला जातो.

एका व्यक्तीकडून घेण्यात आलेला प्लाझ्मा कोरोनाबाधित दोन रूग्णांना दिला जातो. त्यामुळे अनेक रूग्णांना लाभ मिळत असून, ते बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही उपचार पद्धती कोरोनाबाधित रूग्णांना लाभदायक ठरत आहे.

अनेक प्लाझ्मा दाते दान करण्यास तयार आहेत. मात्र, वायसीएम रूग्णालयात एकच मशिन असल्याने दिवसभरात केवळ 5 ते 6 दात्यांकडून प्लाझ्मा घेता येतो. हे मशिन वारंवार खराब होत असल्याने त्या दिवशी प्लाझ्मा घेता येत नाहीत.

या कारणांमुळे इच्छुक असलेल्या असंख्य दात्यांकडून प्लाझ्मा घेता येत नाही. त्यामुळे दात्यांचा हिरमोड तसेच, गैरसोय होत आहे. त्यांना अनेक दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे.

ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने तातडीने वायसीएम रक्तपेढीत प्लाझ्माचे आणखी एक प्लाझ्मा मशिन तातडीने उपलब्ध करून द्यावे.

शहरातील अनेक खासगी कंपन्या सीएसआर निधीतून हे मशिन देऊ शकतात. त्यांच्याकडे विचारणा करावी, अशी सूचना उपमहापौर हिंगे यांनी केली आहे.

नव्या मशिनमुळे कोरोनाबाधित रूग्णांना प्लाझ्मा उपलब्ध होऊन ते बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच, रूग्णालयावरील ताण कमी होईल, असेही ते म्हणाले.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.