Pimpri News : विमा संबंधित कागदपत्रात मराठी भाषा अनिवार्य करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांनी विमा उतरवले, पण विमा संबंधित कागदपत्रात मराठी भाषेचा वापर होत नसल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 345 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 अन्वये महाराष्ट्र राज्याची राजभाषा ‘मराठी’ असून काही वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय प्रयोजना करता मराठी भाषा वापरणे अनिवार्य आहे. तरीही मराठीचा वापर होताना दिसत नाही त्यामुळे विमा संबंधित कागदपत्रात मराठी भाषा अनिवार्य करावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

याबाबत बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. बाबर यांनी या पत्रात राज्यघटना व महाराष्ट्र राजभाषा अधिनियम याची आठवण करून देत विमा संबंधित कागदपत्रात मराठी भाषा अनिवार्य करावी, अशी मागणी केली आहे.

भारत सरकारच्या आदेशानुसार प्रादेशिक भाषेचा वापर प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीही महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कार्यालयात त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी आणि इंग्रजी बरोबर मराठी भाषेचा प्राधान्याने वापर होताना आढळत नाही.

परिणामी शेतकऱ्यांनी विमा घेतला असताना मुदतीनंतर किंवा दुर्घटनेनंतर विमाधारकांना त्याचा परतावा मिळण्याकरता खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विमा करार व संबंधित कागदपत्रे ही मराठीतच असणे गरजेचे असल्याचे बाबर यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.