Pimpri News : ‘दिल्लीमध्ये सुरु असलेले आंदोलन मॅनेज केलेले; आंदोलकांना मिळतोय 300 रुपये रोज’

उपमहापौर केशव घोळवे यांच्याकडून शेतकरी आंदोलनाची थट्टा; घोळवे यांनी माफी मागावी - विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांची मागणी

एमपीसी न्यूज – ‘दिल्ली येथे सुरु असलेले आंदोलन मॅनेज केलेले आहे. आंदोलनातील आंदोलक हे 300 रुपये भाड्याने आणले आहेत’ अशी थट्टा उपमहापौर केशव घोळवे यांनी महापालिका सभा तहकूब करण्याच्या सूचनेवर बोलताना केली. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महापालिका सभा तहकूब करण्याची सूचना मांडली, त्यावेळी उपमहापौर घोळवे यांनी आंदोलकांच्या बाबतीत टीका केली. उपमहापौर घोळवे यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिसाळ यांनी केली आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन मागील 10 ते 12 दिवसांपासून सुरु आहे. त्या आंदोलनामध्ये पंजाब, बिहार आणि हरीयाणाचे शेतकरी स्वत: वाहने घेऊन दिल्लीपर्यंत पोहचले आहेत.

हळूहळू संपूर्ण देशात या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. त्याचाच परीपाक म्हणून आज (मंगळवारी) देशव्यापी बंद पुकारलेला आहे. पिंपरीमध्ये देखील अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि कामगार संघटना आंदोलन करत आहेत.

आज (मंगळवारी, दि. 8) महापालिकेची महापालिका सभा झाली. सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी शेतकरी कायद्याच्या विरोधात सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. यासाठी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी अनुमोदन दिले. नगरसेविका मंगला कदम यांनीही सभा तहकूब करा, अथवा मतदान घ्या, अशी सूचना मांडली.

यावर बोलताना उपमहापौर केशव घोळवे यांनी ‘दिल्लीमध्ये सुरु असलेले आंदोलन मॅनेज केलेले आहे. या आंदोलनातील आंदोलक हे भाडेकरू आहेत. त्यांना रोज 300 रुपये भाड्याने आणले आहे. या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानकडून रसद पुरवली जात असल्याची शंका उपमहापौर घोळवे यांनी व्यक्त करत आंदोलनाची थट्टा केल्याचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सांगितले.

ही बाब निंदनीय असून देशातील सर्व शेतक-यांचा अपमान करणारी आहे. उपमहापौर केशव घोळवे यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. घोळवे यांनी शेतकरी बांधवांची माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.