गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Pimpri news: मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रियायुक्त पाण्याच्या वापरासाठी पालिकेचा ‘मास्टर प्लॅन’ 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 14 मैलाशुद्धीकरण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यात येते. या प्रक्रीया केलेल्या पाण्यापैकी 23 दशलक्ष लिटर पाण्याचा फेरवापर केला जातो. महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात पिण्याव्यतिरिक्तचा वापर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेची स्वत:ची सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे आहेत. महापालिका हद्दीतील सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्यासाठी सद्यस्थितीत एकूण नऊ ठिकाणी 353 दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेचे 14 मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. त्यामध्ये रावेत (20), आकुर्डी (30), चिंचवड (टप्पा 1 – 30, टप्पा 2 – 30), चिखली (टप्पा 1 – 16, टप्पा 2 – 16), कासारवाडी (टप्पा 1 – 40, टप्पा 2- 40, टप्पा 3- 40), दापोडी (20), सांगवी (10), पिंपळे – निलख (20), च-होली (टप्पा 1 – 20, टप्पा 2 – 21) अशा एकूण 353 दशलक्ष लिटर क्षमतेच्या 14 मैलाशुद्धीकरण केंद्रांचा समावेश आहे. 1566  किलोमीटर मलनि:सारण नलिका टाकण्यात आल्या आहेत.

सद्यस्थितीत मैलाशुद्धीकरण केंद्रात येणा-या सुमारे 270 ते 275 दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे. या मैलाशुद्धीकरण केंद्रांवर स्काडा प्रणालीद्वारे देखरेख ठेवली जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत ही स्काडा प्रणाली कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.

मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर केला जातो. कासारवाडी टप्पा एकच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाच एमएलडी पाणी मिलीटरी डेअरी फार्ममध्ये शेतीसाठी वापरले जाते. तर, टप्पा तीनच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले दहा एमएलडी पाणी सीएमई येथील रोइंग​ ​चॅनलसाठी वापरले जाते.

चिखली टप्पा एक आणि दोनमधील मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले तीन एमएलडी पाणी संभाजीनगर, शाहूनगर भागातील महापालिकेची उद्याने, गृहरचना सोसायटींसाठी वापरण्यात येते. वायसीएम रूग्णालयातील 0.65 एमएलडी पाणी रूग्णवाहिका धुणे आणि गार्डनिंगसाठी वापरले जाते. तसेच कासारवाडी, चिंचवड आणि आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेले पाच एमएलडी पाणी महापालिकेच्या ठिकठिकाणच्या उद्यानासाठी टँकरद्वारे वापरण्यात येते.

महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात पिण्याव्यतिरिक्तचा वापर करण्याच्या दृष्टीने महापालिकेचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.

Latest news
Related news