Pimpri News: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापौरांनी राजीनामा द्यावा : मंगला कदम

एमपीसी न्यूज – शहराच्या प्रथम नागरीक असलेल्या महापौर उषा ढोरे यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये स्वत: महापौरांनीच कोरोना विषयक शासनाच्या आदेशाचा भंग केला आहे. त्यांच्यासह भाजपच्या एकाही पदाधिका-यांनी मास्क परीधान केला नव्हता. सभागृहामध्ये सुरक्षित अंतराचे पालन केले नाही. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी महापौर मंगला कदम यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात कदम यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहेत. शहराच्या प्रथम नागरीक असलेल्या महापौर उषा ढोरे यांनी काल आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वत: महापौरांनीच कोरोना विषयक शासनाच्या आदेशाचा भंग केला. त्यांच्यासह भाजपच्या एकाही पदाधिका-यांनी मास्क परीधान केला नाही.

सभागृहामध्ये सोशल डिस्टंन्स न पाळता सभागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झालेली होती. या कार्यक्रमास भाजपचे प्रमूख पदाधिकारीही उपस्थित होते. परंतु, एकाही पदाधिका-यांनी मास्क परीधान केला नव्हता.

शहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी साहित्य खरेदीमध्ये भाजपने भ्रष्टाचार केला. आता कोरोना प्रसार करण्यासही भाजपचे महापौर व पदाधिकारीही जबाबदार आहेत. शहरातील सर्वसामान्य नागरीकांना मास्क परीधान केला नाही तर त्याला महापालिका प्रशासन 500 रुपये दंड करते.

आता शहराच्या प्रथम नागरीक असणा-या महापौर यांच्यावर देखील सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच कारवाई करण्यात यावी. नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच या कार्यक्रमात ज्या भाजपच्या नगरसदस्यांनी मास्क परीधान केला नव्हता त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.