Pimpri News : महात्मा फुलेंनी प्रज्वलीत केलेली क्रांतीज्योत तेवत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – महापौर उषा ढोरे

एमपीसी न्यूज – सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी केलेल्या महान कार्यामुळे तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अविरत प्रयत्नामुळे उपेक्षितांना शिक्षणाची दारे खुली झाली. पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील संधी मिळून त्या देशाच्या प्रधानमंत्री, राष्ट्रपती अशा सर्वोच्च पदावर पोहोचल्या. त्यामुळे महात्मा फुले यांनी प्रज्वलीत केलेली क्रांतीज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई घुले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्या अपर्णा डोके, माजी स्थायी सभापती राजेंद्र राजापुरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक तसेच गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, वासीम कुरेशी आदी उपस्थित होते.

पिंपरी चौक येथील क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास देखील महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्य संतोष लोंढे, नगरसदस्या अपर्णा डोके, माजी स्थायी सभापती राजेंद्र राजापुरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात शाहीर संतोष साळुंखे यांच्या पोवाड्यांच्या कार्यक्रमाने झाली. त्यांनी प्रबोधनपर तसेच महापुरुषांच्या कार्याचे गुणगान करणारे पोवाडे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यानंतर थिएटर वर्कशॉप कंपनी प्रस्तुत आणि प्रभाकर पवार दिग्दर्शित मानवांचा धर्म एक हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. महात्मा फुले यांच्या जीवनावरील महत्वपूर्ण प्रसंग या नाटकातून सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.