Pimpri news: व्यापारी आर्थिक संकटात, दुकाने उघडण्याची परवानगी द्या; उपमहापौरांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – मागील वर्षीच्या लॉकडाउनमुळे व्यापारी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. ‘अनलॉक’मध्ये व्यापार कुठे उभारी घेत असताना पुन्हा 30 एप्रिलपर्यंत दुकाने उघडण्यास मनाई केल्याने व्यापा-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. व्यापारी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. भविष्यातही पालन करणार आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने व्यापा-यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी प्रशासनाकडे केली आहे.

पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांच्यासह उपमहापौर घुले यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांना व्यापा-यांची व्यथा सांगत दुकाने उघडून देण्याबाबतचे सविस्तर निवेदन दिले.

उपमहापौर घुले, पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने 30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे.

व्यापा-यांची परिस्थिती सध्या अतिशय दयनीय झाली आहे. दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे, कर्जाचे मासिक हप्ते भरणे मुश्किल झाले आहे. त्यातच आता वीज बील, महापालिकेचा कर कसा भरायचा, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. लॉकडाऊनमुळे गावी गेलेल्या कामगारांना परत बोलवणे कठिण जात आहे. त्यामुळे व्यावसाय करणे अवघड बनले आहे.

प्रशासन लॉकडाऊन जाहीर करुन मोकळे झाले. परंतु, व्यापा-यांनी स्वत:च्या घरचा खर्च कसा करायचा, मुलांच्या शाळेची फी, इतर खर्च कसा करणार, छोट्या व्यापा-यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. यापुढेही पालन केले जाईल. त्यामुळे व्यापा-यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी निवेदनातून केली आहे”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.