Pimpri News: देहूपर्यंतच्या जलवाहिनी खोदाईसाठी ‘एमआयडीसी’ला 2 कोटी खोदाई शुल्क  

एमपीसी न्यूज – चिखली जलशुद्धीकरण केंद्रापासून देहूपर्यंत जलवाहिनी टाकण्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या अखत्यारीतील रस्ते खोदाईस त्यांची परवानगी घेण्यात येणार आहे. त्यांना 1 कोटी 87 लाख 6 हजार 350 रुपये खोदाई शुल्क आणि 10 लाख सुरक्षा ठेव असे 1 कोटी 97 लाख 6 हजार 350 रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

आंद्रा धरणातून 36.87 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा पिंपरी-चिंचवड शहरासाठी राज्य सरकारने 13 नोव्हेंबर 2018 रोजी मंजूर केला आहे. अशुद्ध पाणी इंद्रायणी नदीतून मौजे निघोजे-तळवडे येथून उपसा करण्यास जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी बदल करण्यास मान्यता दिली आहे.

या कामाअंतर्गत निघोजे-तळवडे  येथून पाणी उपसा करण्यासाठी तळवडे येथील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमधील रस्त्यामधून 1250 मिली मि.मी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी रस्ता खोदाई  करण्याकरिता महापालिकेमार्फत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे विनंती अर्ज करण्यात आला होता. एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या क्षेत्रातील रस्ता खोदाई करण्यासाठी 1 कोटी 87 लाख 6 हजार 350 रुपये खोदाई शुल्क आणि 10 लाख सुरक्षा ठेव असे एकूण 1 कोटी 97 लाख 6 हजार 350 रुपये रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करण्याबाबत कळविले होते.

सन 2020-21 च्या मूळ अंदाजपत्रकात आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पांतर्गत चिखली येथे उभारायच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी देहू येथून नदीतून जलउपसा करुन पाईप लाईनद्वारे पाणी आणणे. इतर अनुषंगिक कामे करणे, या कामाअंतर्गत देहू येथील (बोडकेवाडी बंधारा) येथून जलशुद्धीकरण केंद्र चिखलीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे या लेखाशिर्षांतर्गत 22 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. त्यातून  1 कोटी 97 लाख 6 हजार 350 रुपये रस्ता खोदाई शुल्क एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे जमा केली जाणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.