Pimpri News : कोरोना काळात पालिकेच्या भांडार विभागाचा चादर, बेडशीट खरेदीत गैरव्यवहार; आमदार जगताप यांचा हिवाळी अधिवेशनात प्रश्न

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाकडून चादर आणि बेडशीट बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करत त्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसून महाराष्ट्र राज्य हातमाग महासंघाच्या नियमानुसार खरेदी झाल्याचे सांगितले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नात म्हटले आहे की, महापालिकेच्या भांडार विभागाने सोलापुरी चादर, बेडशीटची थेट पद्धतीने सुमारे 80 लाख 61 हजारांची खरेदी केली आहे. त्यासाठी 429 रुपये 20 पैसे दराने बेडशीट तर 376 रुपये 95 पैसे दराने चादर घेण्यात आली आहे. सोलापुरी चादर 90 रुपयांपासून 132 रुपयांपर्यंत तर बेडशीट 75 रुपयांपासून 110 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. असे असतानाही पालिकेने तिप्पटीहून अधिक दराने चादर आणि बेडशीटची खरेदी केली आहे.

या खरेदीमध्ये संबंधित ठेकेदाराला 60 लाख रुपये जास्तीचे देण्यात आले आहेत. ही खरेदी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून (महाटेक्स) न करता घाटकोपर येथील एका एजंटमार्फत करण्यात आली आहे. कमी रकमेमध्ये साहित्य उपलब्ध असतानाही थेट खरेदी करण्यात आली आहे. याबाबत पालिका आयुक्तांकडे या खरेदीची दक्षता समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी केली असल्याचेही आमदारांच्या प्रश्नात म्हटले आहे.

त्यावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना काळात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल व विलगीकरण कक्ष निर्माण केले. त्यासाठी चादर आणि बेडशीटची आवश्यकता होती. 24 मार्च 2020 पासून देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने व्यापारी, वाणिज्यिक आस्थापना बंद होत्या. आपत्ती, साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तातडीने खरेदी करण्याची गरज असते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा अवलंब करणे व्यवहार्य नसते. त्यावेळी एकलस्त्रोत पद्धतीने खरेदी करावी, अशी तरतूद उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय आणि खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीच्या पुस्तिकेमध्ये आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीत महाटेक्स यांच्याकडून खरेदी करण्याच्या वस्तूंसाठी ठरवलेल्या दर पत्रकानुसार बेडशीट 429.20 रुपये दराप्रमाणे 10 हजार नग आणि चादर 376.75 या दराप्रमाणे 10 हजार नग खरेदी करण्यात आले आहेत. त्यासाठी 80 लाख 61 हजार 500 रुपये खर्च करण्यात आले आहेत.

ही खरेदी करताना पालिकेने लॉकडाऊन असूनही व्यापारी आस्थापनांशी संपर्क साधला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात चादर व बेडशीट उपलब्ध नसल्याची बाजारातील दरांबाबत खातरजमा करून महाटेक्सच्या दरापेक्षा जास्त नसलेल्या दराने पालिकेने बाहेरून खरेदी केली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी उत्तरात सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.