Pimpri News: विमा योजनेसाठी पाण्याचा निधी पळविणे गैर – संजोग वाघेरे

महापालिका कर्मचा-यांसाठी धन्वंतरी स्वास्थ योजना चालू ठेवण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांचा विमा योजनेला तीव्र विरोध आहे. त्यामुळे विमा योजनेची कार्यवाही तत्काळ थांबवावी. तसेच कर्मचा-यांसाठी धन्वंतरी स्वास्थ योजना चालू ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे. शहरातील पाणीप्रश्नाचा विचार करता पाणीपुरवठा योजनांचा निधी पळविणे, ही बाब देखील शहराच्या दृष्टीने गैर असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात शहराध्यक्ष वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांवर वैद्यकीय उपचारासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती.

ही योजना महानगरपालिकेतील कर्मचारी, अधिकारी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात राबविण्यात आली होती. परंतु, महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकारी व नेत्यांनी कर्मचा-यांसाठी विमा योजना राबविण्याचा घाट घातला.

या योजनेला सुरुवातीपासून विरोध होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने या योजनेतील त्रृटी दाखवून देत विमा योजना न राबविण्याची आग्रही मागणी केली आहे. विमा योजना राबवू नये. तसेच धन्वंतरी स्वास्थ योजना चालू ठेवण्यासाठी त्यांनी 20 जानेवारी 2021 रोजी लाक्षणिक उपोषणही केले.

धन्वंतरी स्वास्थ योजना तुर्तास बंद करण्यास औद्योगिक न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले आहेत. तसे असताना सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे प्रशासनामार्फत विमा योजना अंमलात आणण्यासाठी सर्व खटाटोप सुरू आहे.

या विमा योजनेसाठी निधी देण्याकरिता एकूण 21 कोटी रुपयांची तरतूद वर्गीकरण महानगरपालिका सर्वसाधारण सभेत 20 जानेवारी 2021 रोजी करण्यात आले. त्यासाठी पाणीपुरवठा विशेष योजना निधीतील तरतूद वळविण्यात आली आहे.

शहरातील पाणीप्रश्नाचा विचार करता पाणीपुरवठा योजनांचा निधी पळविणे, ही बाब देखील शहराच्या दृष्टीने चुकीची आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मागणी करून देखील सभागृहात त्यांना बोलू न देता सत्ताधारी पक्षाने बहुमतावर हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे तातडीने विमा योजना लागू करण्याची कार्यवाही थांबवावी आणि धन्वंतरी स्वास्थ योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी वाघेरे-पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.