Pimpri News: स्वबळाची भाषा, अग्रलेख, दिल्ली दौरा अन् सिल्वर ओक; आशिष शेलार यांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

राज्याचे प्रश्न कोमात अन् स्वबळाची छमछम जोरात

एमपीसी न्यूज – राज्यासमोर विविध गंभीर प्रश्न असताना महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना याचे काही घेणेदेणे नाही. रोज स्वबळावर लढणार आणि सरकार पाच वर्षे टिकणार याशिवाय कोणत्याही प्रश्नांवर सरकारमधील लोक बोलत नाहीत. एक नेता स्वबळाची भाषा करतो. त्यावर दुसरा अग्रलेख लिहतो. तिसरा दिल्लीला जातो आणि उरलेले दोघे ‘सिल्वर ओक’वर जातात. सर्वजण फुगवून बळ आणतात. स्वबळ आणि सरकार पाच वर्षे टिकणार यापुढे सरकारमधील नेत्यांना जनतेच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. त्यामुळे राज्याचे प्रश्न कोमात अन् स्वबळाची छमछम जोरात असल्याचे टीकास्त्र माजी शालेय शिक्षणमंत्री, भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर सोडले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपचा संघटनात्मक आढावा शेलार यांनी आज (बुधवारी) घेतला. महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, प्रदेश सचिव अमित गोरखे, पीसीएनटीडीएचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणी, स्वीकृत नगरसेवक बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, अमोल थोरात उपस्थित होते.

त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाली. कर्जमाफी झाली नाही. वादळात नुकसान झालेले नागरिक मदतीपासून वंचित, बारा बलुतेदारांना मदत मिळेना, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविता आले नाही, महिला अत्याचारामध्ये दुर्दैवाने राज्याचा चढता क्रमांक आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये गँगवार सुरु आहे. माजी गृहमंत्री फरार आहेत. पोलिसांच्या माध्यमातून हप्ते वसुली केली जात आहे असे गंभीर प्रश्न असताना महाविकास आघाडीतील नेत्यांचे त्याकडे लक्ष नाही.

एक नेता दररोज सकाळी स्वबळाची भाषा करतो. त्यावर दुसरा अग्रलेख लिहतो. तिसरा दिल्लीला जातो आणि उरलेले दोघे सिल्वर ओकवर जातात. सर्वजण फुगवून बळ आणतात. दररोज स्वबळ आणि सरकार पाच वर्षे टिकणार हेच सांगतात. सरकार टिकणार की जाणार हे जनता ठरवेल. सरकारचे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे. सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत बेफिकिर असल्याचा आरोप करत शेलार म्हणाले, फोन टॅपिंगचे धंदे विरोधकांचे आहेत. असे कोणतेही काम केंद्र सरकारकडून होणार नाही. होत नाही आणि होऊ शकत नाही. विरोधकांनी पुरावे द्यावेत. अन्यथा गप्प बसावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.