Pimpri Corona News : कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी आमदार बनसोडे यांनी दिला 25 लाखांचा निधी

लसीकरणासाठी आमदार निधी देणारे पहिलेच आमदार

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस खरेदीकरिता आज (शुक्रवारी) दिला. लसीकरणासाठी आमदार निधी देणारे ते शहरातील पहिलेच आमदार आहेत.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना पत्र दिले आहे. आमदार बनसोडे यांनी या पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र बसविण्यासाठी मार्च महिन्यात सव्वा कोटी रुपये आपल्या आमदार निधीतून दिले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना आपला HRCT SCORE किती आहे,हे आता मोफत कळणार आहे. त्यासाठी बाराशे ते पाच हजार रुपये शुल्क आहे.

आमदार बनसोडे यांनी आता लस खरेदीसाठीही 25 लाख रुपये दिल्याने कोरोनासाठी सर्वाधिक निधी देणारे ते शहरातील पहिले आमदार ठरले आहेत. या निधीतून आपल्या पिंपरी मतदारसंघातील नागरिकांसाठी लस खरेदी करावी, असे पत्र त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना दिले.

कोरोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या लसीकरण मोहिमेचा सध्या बोजवारा उडाला आहे. बहूतांश लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर 18 ते 44 वयोगटात ती टोकन स्वरुपात सुरु आहेत. तेथे ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जात आहे. 18 ते 44 वयोगटाचे हे लसीकरण 1 मे ला सुरु झाल्यावर लस व मनुष्यबळाचाही प्रश्न उभा राहण्याची भीती आमदार बनसोडे यांनी त्याअगोदर आठ दिवस वर्तवली होती.

हा प्रश्न उभा राहणार असल्याने त्यांनी या मोहिमेचे योग्य नियोजन करण्याची सूचना पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांना केली होती. ती 1 मेलाच शंभर टक्के खरी ठरली. कारण पुरेशा लसीअभावी त्यादिवशी 18 ते 44 चे लसीकरण सुरु झाले.मात्र, 45 वर्षावरील लसीकरण बंद पडले. म्हणून आता आमदार बनसोडेंनी या समस्येवर उतारा म्हणून लस खरेदीसाठी 25 लाख रुपये दिले आहेत.

यासंदर्भात आमदार बनसोडे म्हणाले, माझा मतदारसंघ झोपडपट्ट्यांचा आहे. तेथे हातावर पोट असलेला अशिक्षित व कष्टकरी गरीब वर्ग राहतो. त्यांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करता येत नाही. म्हणून त्यांना ही लस थेट दिली जावी म्हणून हा निधी दिला आहे.

ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार घरगुती गॅसवरील सवलत (सबसिडी) ती परवडणा-यांनी सोडली. त्याचे अनुकरण या लसीच्या बाबतीत होण्याची गरज आहे. त्यामुळे ही लस घेण्याची ऐपत असलेल्यांनी लसीचे पैसे राज्य सरकारकडे जमा करावेत. त्यातून या लसीकरण मोहिमेला बळ मिळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.