Pimpri News: वल्लभनगर आगारातील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची आमदार जगताप यांच्याकडून जेवणाची सोय

एमपीसी न्यूज – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी (दि. 5) दुसऱ्यांदा भेट दिली. या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी आंदोलनाची स्थिती आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. आंदोलन सुरू असेपर्यंत सर्व आंदोलक कर्मचाऱ्यांना जेवण पुरवण्याची जबाबदारी आमदार जगताप यांनी स्वीकारली. तसेच अन्य कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात एक महिन्याहून अधिक काळ झाले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वल्लभनगर येथे एसटीचे स्थानक व डेपो आहे. येथील 190 हून अधिक कर्मचारीही राज्यभर सुरू असलेल्या अंदोलनात सहभागी आहेत.

एसटी स्थानकाच्या बाहेर छोटा मंडप टाकून हे कर्मचारी शांततेने आंदोलन करत आहेत. परंतु, आता प्रशासनाने कर्मचाऱ्यांना हा मंडप हटवण्यास भाग पाडून एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसराबाहेर आंदोलन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांनी स्थानकापासून 200 मीटर परिसराबाहेर आंदोलन सुरू ठेवले आहे.

ही बाब समजताच आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी नवीन आंदोलन स्थळी भेट दिली. त्यांनी दुसऱ्यांदा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका उषा मुंढे, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी संतोष कलाटे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप यांनी आंदोलनाच्या सद्यःस्थितीबाबत माहिती घेतली. विलीनीकरण नाही, तर आंदोलन मागे नाही ही भूमिका कायम असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

आमदार जगताप यांनी आंदोलन करताना एसटी कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याचीही माहिती घेतली. सर्व अडचणींवर मात करून एसटी कर्मचारी आंदोलन यशस्वी करतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

तसेच आंदोलनात सहभागी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन सुरू असेपर्यंत जेवण पुरवण्याची हमी त्यांनी दिली. आपली जबाबदारी समजून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना अन्य कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.