Pimpri News: दररोज पाणीपुरवठा करा, मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद करण्यात यावा. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा सुरु करावा अशी मागणी मनसेने महापालिका आयुक्तांकडे केली.

शहराध्यक्ष, गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. दररोज पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल, त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास दोन वर्षांपासून ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेली आहे.

कोरोना काळात देखील शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरलेले असताना प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात देखील या धोरणात पालिकेकडून शिथिलता दिली जात नाही. आंद्रा व भामा आसखेड धरणाच्या पाण्याचे गाजर अजून किती दिवस लोकांना दाखवणार आहात? नागरिकांची दररोज पाणी देण्याची मागणी वाढत आहे. 1 नोव्हेंबरपासून शहरात सर्वत्रच टप्पाटप्प्याने नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी आपण आयुक्त या नात्याने पुढाकार घ्यावा. नागरिकांना नियमित पाणी देऊन दिलासा द्यावा. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने पाणी देण्यास भाग पाडेल असा इशारा चिखले यांनी दिला.

शहरसचिव रुपेश पटेकर, महीला अध्यक्ष अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, श्रद्धा देशमुख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.