Pimpri News: आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळणार, मात्र…!

मनसेचे प्रभारी रणजित शिरोळे यांचे वक्तव्य

एमपीसी न्यूज – विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक बैठकीला मनसैनिकांची उपस्थिती लक्षणीय असते. या बैठकांची गर्दी पाहता पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत चांगले यश मिळणे निश्चित आहे. मात्र, त्यासाठी मनसैनिकांनी जिवाचे रान करीत पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी रणजित शिरोळे यांनी केले.

मनसेच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यावेळी महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करताना शिरोळे बोलत होते. यावेळी मनसेच्या प्रभागनिहाय नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.

मनसेचे गटनेते व शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष राजू सावळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयुर चिंचवडे, शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी, शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, जनहित कक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ भालेराव, सचिव अनिकेत प्रभु, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ, मतदारसंघातील उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, संघटक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

रणजित शिरोळे म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय बैठकांचे नियोजन केले आहे. त्यानुसार विभागवार बैठका घेणे सुरू आहे. महापालिका निवडणुकीपर्यंत नियोजनासाठी बैठकांच्या सर्वात जास्त फेऱ्या करणार आहोत. विभागनिहाय व प्रभागनिहाय बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रमुख मुद्यांवर चर्चा केली जात आहे.

प्रत्येक बैठकीला महाराष्ट्र सैनिकांची उपस्थिती लक्षणीय असते. या बैठकांची गर्दी पाहता पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळणे निश्चित आहे. मात्र त्यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी जीवाचे रान करीत पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यत पोहोचविणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

चिखले म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला अवघे दहा महिने शिल्लक राहिले आहेत. गतवेळच्या महापालिका निवडणूक काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बऱ्यापैकी हवा होती व आताही आहे. आगामी महापालिका निवडणूकीत मनसे हाच कसा प्रमुख पक्ष होईल, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. निवडणुकीपर्यंत राजकीय हालचालींमध्ये कमालीचा बदल झालेला दिसला पाहिजे. पदाच्या माध्यमातून पक्ष प्रत्येकाला बळकटी देतच आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.