Pimpri News: रखडलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या सोडतीला मिळाला मुहूर्त; शनिवारी होणार सोडत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयवादाच्या लढाईत रद्द झालेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या (शनिवारी) सोडत काढण्यात येणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी सकाळी 11 वाजता होणा-या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे असणार आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत.

त्यातील च-होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पासाठी नागरिकांकडून अर्ज मागविले होते.

या योजनेकरिता एकूण 47 हजार 878 इतके अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 47 हजार 707 अर्ज पात्र ठरलेले आहेत. सध्या प्रकल्पाच्या अंतर्गत चऱ्होली 1442, रावेत 934 आणि बोऱ्हाडेवाडी 1288 अशा एकूण 3664 सदनिकामाठी सोडत काढण्यात येणार आहे.

या योजनेकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर दाप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण आहेत.

या योजनेकरिता 3664 सदनिकेची निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये सदनिका धारकास प्रथमतः 10 टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे.

या योजनेची, सोडत www.facebook.com व pemcindia gov.in पेजवर करण्यात येणार आहे. तर, Livewww.youtube.com/PCMCINDIA) या लिंकद्वारे दाखविण्यात येणार आहे.

नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून उपस्थित न राहता वरील प्रमाणे दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन उपस्थित राहावे, सोडतीचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.