Pimpri News : पोटगी आणि मुलाच्या अटकेविरोधात आईचे बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज – शिरुर कोर्टाने पोटगीचा दिलेला निर्णय तसेच, मुलाला बेकायदेशीर अटक केली म्हणून मुलाच्या आईने कोर्टासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शिरुर कोर्टाने पुरावे सादर करण्याची संधी न देता निर्णय दिला. त्यामुळे पोटगीचा निर्णय रद्द करुन मुलाची सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याप्रकरणी मोनिष गादिया यांची आई शशिकला गादिया, पोटगी बंद आंदोलनाचे ॲड अतुल छाजेड, कौटुंबिक कायदा अभ्यासक मुकेश शामराव खनके यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

ॲड. अतुल छाजेड म्हणाले, ‘शिरुर कोर्टाने मोनिष गादिया यांची बाजू जाणून न घेता तसेच, पुरावे सादर करण्याची संधी न देता निर्णय दिला व त्यांना बेकायदेशीरपणे अटक केली. शिरुर कोर्टाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचा देखील अवमान करत गादिया यांच्या विरोधात निकाल देत त्यांना पोलीस कोठडी दिली.’

छाजेड म्हणाले, ‘मोनिष गादिया यांच्या पत्नी सुनावणीच्या वेळेस कोर्टात हजर राहत नाहीत. कोर्टाने मोनिष गादिया यांचे अंदाजे मासिक वेतन ठरवून पोटगीची रक्कम देखील निश्चित केली. मोनिष यांच्या पत्नी खासगी कंपनीत कामाला आहेत.

मात्र, कोर्ट हे पुरावे सादर करण्याची संधी देत नाही. पुणे कौटुंबिक न्यायालयात केस 168/2018 मध्ये कसलाही पोटगीचा आदेश निघाला नाही. मग, या केस मध्ये वेगळा निर्णय का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.’

पोटगीचा निकाल रद्द करुन घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत मोनिष प्रकाश गादिया यांना ताबडतोब सोडण्यात यावे. प्रतिपक्षावर कोर्टाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करावा आणि मोनिष गादिया यांना मानहानीची भरपाई मिळावी, अशी मागणी मोनिष गादिया यांची आई शशिकला गादिया यांनी केली आहे. निर्णय होत नाही तोपर्यंत त्या कोर्टासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.