Pimpri News : विविध मागण्यासाठी महिला सफाई कामगारांचे महानगरपालिकेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – विविध मागण्यांसाठी महिला सफाई कामगारांनी सोमवारी (दि. 26) महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. महिला सफाई कामगारांना सेवेत कायम करावे तसेच, घरकुल योजनेत त्यांना प्राधान्य द्यावे यासह विविध मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या.

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्याध्यक्ष बळीराम काकडे , भीमा-कोरेगाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिता साळवे, प्रल्हाद कांबळे, सविता लोंढे , मंगल तायडे , मधुरा डांगे, कांताबाई कांबळे, आशा पठारे आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले, गेल्या वीस वर्षापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांना नियमानुसार महानगरपालिकेने कायम सेवेत घेतले पाहिजे होते. मात्र, तसे न करता गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरू असून त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जात नाही. यापूर्वी देण्यात आलेले ठेके आता संपत आले असून पुन्हा त्याच ठेकेदारांना आणि इतर ठेकेदारांसाठी पुन्हा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु ही निविदा रद्द करून कर्मचाऱ्यांना कायम करावे अशी मागणी त्यांनी केली.

या आहेत मागण्या

– कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांना कोरोना आपत्ती काळात सेवा दिल्याबद्दल किमान पाच हजार रुपये आर्थिक मदत करावी

– दिवाळीनिमित्त पगार एवढा बोनस देण्यात यावा,

– साफसफाई कामगार महिलांचा थकीत प्रा. फंड तातडीने देण्यात यावा

– ‘समान काम समान दाम’ या पद्धतीने आणि सरकारने ठरवून दिले प्रमाणे किमान वेतनाचा फरक मिळवून द्यावा

– महिला साफसफाई कामगार कायमस्वरूपी महानगरपालिका सेवेत सामावून घ्यावे

– घरकुल योजनेत साफसफाई कामगार महिलांना प्रधान्य देण्यात यावे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.