Pimpri News: महावितरणाचा गलथान कारभार; वीज बिल भरुनही तोडले जातेय ‘कनेक्शन’

एमपीसी न्यूज – वीज बिल भरले असतानाही महावितरणकडून वीज ‘कनेक्शन’ तोडण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. नियमितपणे बिल भरुनही ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयाची आणि खराळवाडीतील पिंपरी-चिंचवड सिरॉलॉजिकल ब्लॅड बँकेचे वीज जोड गुरुवारी तोडण्यात आले होते. नियमितपणे वीज बिलाचा भरणा केला असतानाही महावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वीज जोड तोडणीला राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्थगिती दिली होती. अधिवेशन पार पडताच स्थगिती उठविली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) वीज बिल वसुलीची मोहिम हाती घेतली आहे. बिल थकविले असलेल्या ग्राहकांची वीज तोडली जात आहे. परंतु, महावितरणकडून नियमितपणे वीज बिल भरलेल्याची देखील वीज कापली जात आहे.

नियमितपणे वीज बिलाचा भरणा करून देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयातील वीज जोड गुरुवारी तोडण्यात आले.

तसेच खराळवाडीतील पिंपरी-चिंचवड सिरॉलॉजिकल ब्लॅड बँकेचे वीज जोडही तोडण्यात आले होते. बिल भरूनही महावितरणच्या गलथान कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागला. ब्लॅड बँक अत्यावश्यक सेवा असताना आणि बिल भरणा केला असतानाही वीज तोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ब्लड बँकेचे दीपक पाटील म्हणाले, वीज बिल भरलेले असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी परस्पर वीज तोडली होती. गुरुवारी भरल्याबाबतची साधी विचारणा करण्याची तसदी देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. कोणतीही खातरजमा न करता अत्यावश्यक सेवा असतानाही ब्लड बँकेची वीज तोडली होती.

ब्लड खराब झाले तर त्याला कोण जबाबदार राहील. जोडणीचे पैशे दिल्यानंतरही वीज जोडणीस चार तास लावले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, नजरचुकीने वीज तोडली गेली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.