Pimpri News : विस्कळीत पाणीपुरवठ्यासाठी महावितरण जबाबदार नाही

शुक्रवारी (दि. 4) रात्री 11 वाजता रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला होता.

एमपीसी न्यूज – महापालिकेकडून रावेत जल उपसा केंद्रातील अंतर्गत विद्युत विषयक दुरुस्ती कामासाठी गुरुवारी (दि. 3) सुमारे आठ तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, त्यासाठी महावितरण जबाबदार नसल्याचा खुलासा महावितरणने केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा महावितरणकडून सुरळीत केला असल्याचे महावितरणने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शनिवारी व रविवारी (दि. 4 व 5) पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत आहे.

मात्र, रावेत जलउपसा केंद्राच्या वाढीव वीजभाराचे काम करण्यासाठी महापालिकेकडून गुरुवारी (दि. 3) सकाळी 10 वाजता विद्युत विषयक काम सुरु करण्यात आले व सायंकाळी 6.30 वाजता हे काम पूर्ण झाले.

या कालावधीत महापालिकेच्या मागणीनुसार महावितरणकडून जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता व या कालावधीत पंपींग बंद होते.

त्यानंतर शुक्रवारी (दि. 4) रात्री 11 वाजता रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला होता.

मात्र, महावितरणने लगेचच तांत्रिक उपाययोजना करून 50 मिनिटांनी पर्यायी व्यवस्थेद्वारे या केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत केला.

हा 50 मिनिटांचा अपवाद वगळता महावितरणकडून रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासाठी आम्ही जबाबदार नसल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.