Pimpri Corona News : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सज्ज रहावे – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला देखील दुसर्‍या लाटेचा मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे निदर्शनास आलेले आहे. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर के. विजयराघवन तसेच महाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीदेखील कोरोना संसर्गाची तिसरी लाट लवकरच येत असल्याची धोक्याची सूचना दिली आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका आत्ताच लक्षात घेऊन वेळीच कडक उपाययोजना तसेच धोरणाची कडक अमलबजावणी करणे गरजेचे झालेले आहे. याकरिता महापालिका प्रशासनाने वेळीच सज्ज रहावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना ई मेल-द्वारे केलेल्या निवेदनात केलेली आहे.

याविषयी बोलताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, दुसर्‍या लाटेचा सामना करताना प्रशासनाकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत. त्याची पुन्हा पुनरावृत्ती व्हायला नको अशा पद्धतीने प्रशासनाने कामकाज केले पाहिजे. ही माफक अपेक्षा नागरिक करीत आहे. शहरातील कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची लूट सुरू आहे. ठराविक अधिकारी, कर्मचारी,डॉक्टर, खाजगी रुग्णालये यांनी लूट मांडलेली आहे. त्याला वेळीच लगाम घातला गेला पाहिजे. यासर्व गोष्टी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात यावी.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण ही महत्वाची उपचारपद्धती आहे.महापालिकेच्या सर्व शाळा इमारतीमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावेत. महापालिकेच्या वतीने 18 वर्षावरील सर्वच नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी आतापासूनच केंद्र व राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण मागणी केली पाहिजे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये स्वतंत्र ऑक्सिजन जनरेटर प्लांट असणे जरुरीचे आहे.

महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये लिक्विड ऑक्सिजन ठेवण्यासाठी टॅंक असणे जरुरीचे आहे. शहरातील 50 बेडपेक्षा जास्त क्षमता असलेले सर्व रुग्णालयांनी महापालिकेच्या अखत्यारीत रुग्ण दाखल केले गेले पाहिजे तसेच रुग्णाची बिले ही महापालिकेने ठरवून दिलेल्या दरानुसारच घेतली गेली पाहिजे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या तसेच खाजगी रुग्णालयामध्ये औषधसाठा हा वेळीच उपलब्ध झाला पाहिजे तसेच प्रत्येक रुग्णालयामध्ये बेड क्षमतेच्या 50 % औषध साठा उपलब्ध असणे अनिवार्य आहे. औषधांचा काळाबाजार होता कामा नये. महापालिकेच्या तसेच सर्व खाजगी रुग्णालयामध्ये समुपदेशक तसेच फिजिओथेरीफीस्ट तज्ञांची निवड करण्यात यावी, यामुळे रुग्णाच्या मनातील भीती कमी करून योग्य उपचार करणे शक्य होणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरू शकते त्यामुळे लहान मुलांसाठी बालरोगतज्ञ तसेच संसर्गजन्य रोग तज्ञाच्या उपलब्धतेसह अत्याधुनिक सुविधासह दोन सुसज्ज रुग्णालये व लसीकरण केंद्रे तयार असणे गरजेचे आहे. त्यासाठी देखील उपाययोजना असणे जरुरीचे आहे.

घरगुती सेवा पुरवणारे, छोटे व्यावसायिक, व्यापारी, मजूर, खाजगी सोसायटीमधील सुरक्षारक्षक, अत्यावश्यक सेवा पुरवणारे नागरिक अश्या सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करून तपासणी करणे गरजेचे आहे. हाऊस टू हाऊस सर्वेक्षण तातडीने सुरू करावे.
रुग्णवाहिका सुसज्ज असणे जरुरीचे आहे तसेच रुग्णवाहिकेचे दरपत्रक हे ठरवून दिले पाहिजे.

कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी तसेच महापालिकेच्या वतीने छोट्या छोट्या समित्या स्थापन करून शहरातील झोपडपट्टी भागात तसेच दाट वस्तीच्या ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात यावेत. कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता, लोकभावना न दुखावता, कोणत्याही स्वरूपाची रक्कम न स्वीकारता करण्यात यावी.

कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सज्ज रहाणेबाबत सर्व संबधित विभागांना त्वरित निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.