Pimpri News: महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करा; आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी (पेन्शनधारक) आणि मानधनावरील, ठेकेदारीपध्दतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचा-यांनी अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कर्मचा-यांनी तत्काळ लसीकरण करुन घ्यावे.

लस घेतलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी विभागातील आस्थापना लिपिकाकडे लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे. विभागप्रमुखांनी नियंत्रणाखालील अधिकारी, कर्मचा-यांनी लस घेतल्याची खातरजमा करुन प्रशासन विभागास अवगत करावे, असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला. आयुक्तांनी चौथ्यावेळी लस घेण्याबाबतचा आदेश काढला आहे.

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात (शिक्षक, कर्मचाऱ्यांसह) 7 हजार 479 अधिकारी, कर्मचारी कामकाज करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येतात. यापूर्वीच्या दोन लाटांचा पूर्वानुभव विचारात घेता तिस-या लाटेची शक्यता विचारात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे. कोरोना आजारापासून संरक्षण मिळावे. याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेण्याबाबत तीनवेळा कळविण्यात आले. त्यानंतरही बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी (पेन्शनधारक), मानधनावरील, ठेकेदारीपध्दतीच्या कंत्राटी कर्मचा-यांनी तत्काळ कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी दोन्ही डोस घेतलेले नाहीत. अशा सर्वांनी तत्काळ लस घ्यावी. जे अधिकारी, कर्मचारी लस घेण्यास हेतुपुरस्सर विलंब अथवा टाळाटाळ करतील. अशा अधिकारी, कर्मचा-यांना लस घेण्याबाबत विभागप्रमुखांनी स्वत: प्रवृत्त करावे.

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबतीत लेखा विभागाने लसीकरणाचा लभा घेतल्याबाबत आढावा घ्यावा. लस घेतलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी आस्थापना लिपिकाकडे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र पुराव्यासाठी सादर करावे. विभागप्रमुखांनी नियंत्रणाखालील अधिकारी, कर्मचा-यांनी लस घेतल्याची खातरजमा करुन प्रशासन विभागास अवगत करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.