Pimpri Corona News: उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महापालिका आयुक्तांकडून केराची टोपली : विलास लांडे यांचा आरोप

जम्बो कोविड सेंटरसाठी तालेरा कंपनीचे गोडाऊन ताब्यात घेण्याची मागणी

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खुल्या मैदानात कोविड सेंटर उभारण्यापेक्षा महापालिकेची नवीन रुग्णालये आणि मोकळ्या इमारतींमध्ये व्यवस्था करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांना दिले होते. त्याला केराची टोपली दाखवून प्रशासनाकडून मोकळ्या जागेतच कोविड सेंटर उभारली जात आहेत. भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ताधा-यांचा हा सर्व खटाटोप सुरू असल्याचा आरोप माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे. जम्बो कोविड सेंटरसाठी दिघीतील तालेरा कंपनीचे गोडाऊन ताब्यात घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लांडे यांनी म्हटले आहे की, खुल्या जागेवर कोविड सेंटर उभे केल्यास रुग्णांना पाऊस, वादळ, वारा याचा त्रास सहन करावा लागेल. अशा वेळी रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते. याउलट दिघी येथील तालेरा कंपनीचे गोडाऊन सध्या उपलब्ध आहे. त्याठिकाणी पाच हजार बेड्सची व्यवस्था होऊ शकते. येथे वाहनतळाची व्यवस्था आहे. रुग्णवाहिका येण्या-जाण्यासाठी दिघी ते आळंदी रस्त्याची सोय आहे. या मार्गावर वाहतूककोंडी होणार नाही.

रुग्णवाहिकेला कोणत्याही प्रकारचा अडथाळा निर्माण होणार नाही. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने तालेरा कंपनीचे हे गोडाऊन जम्बो कोविड केअर सेंटर म्हणून दिर्घकाळ उपयोगी ठरेल. हे गोडाऊन ताब्यात घेतल्यास मोकळ्या जागेवर जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी होणारा पालिकेचा करोडो रुपयांचा खर्च वाचेल. त्यामुळे पालिकेने हे गोडाऊन ताब्यात घ्यावे. तसे आदेश आयुक्त राजेश पाटील यांना द्यावेत, अशीही मागणी माजी आमदार लांडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.