Pimpri News: पालिकेने 5255 थुंकीबहाद्दरांकडून केला 8 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कारवाई केली जात आहे. शहरातील 5255 थुंकीबहाद्दरांकडून तब्बल 8 लाख 10 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

यामध्ये सर्वाधिक ‘ग’ प्रभागातील 868 थुंकीबहाद्दरांकडून एक लाख 30 हजार 200 रुपये तर सर्वात कमी ‘क’ प्रभागात 421 जणांकडून 63 हजार 150 रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. थुंकीमधून या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होतो. थुंकी सुकली नाही. तर, पुढील काही तास या थुंकीतले विषाणू जिवंत राहतात आणि आजार बळावण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये, असे आवाहन महापालिकेकडून केले जाते. परंतु, नागरिकांकडून त्याचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे पालिका आरोग्य विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून अगोदर 150 रुपये दंड वसूल केला जात होता. तरी, देखील थुंकण्याचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून 1 हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल केला जात आहे.

मार्चपासून 25 नोव्हेंबर 2020 पर्यंत पालिकेने 5255 थुंकीबहाद्दरांवर कारवाई करत त्यांच्याकडून 8 लाख 10 हजार 400 रुपये दंड वसूल केला आहे. ‘अ’ प्रभागातील 832 नागरिकांकडून 1 लाख 24 हजार 800 रुपये, ‘ब’ 561 लोकांकडून 89 हजार 250 रुपये, ‘क’ 421 जणांवर कारवाई करत 63 हजार 150 रुपये, ‘ड’ 677 लोकांकडून 1 लाख 2 हजार 400 रुपये, ‘इ’ 612 नागरिकांकडून 91 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

‘फ’ प्रभागातील 737 जणांकडून 1 लाख 13 हजार 150 रुपये, ‘ग’ प्रभागातील 868 लोकांकडून 1 लाख 30 हजार 200 रुपये आणि ‘ह’ 533 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 81 हजार 650 रुपये दंड वसूल केला आहे. त्यात ‘ग’ प्रभागातील सर्वाधिक 868 लोकांकडून 1 लाख 30 हजार 200 रुपये आणि ‘क’ प्रभागातील सर्वात कमी 421 जणांकडून 63 हजार 150 रुपये दंड वसूल केला आहे. तर, पालिकेच्या पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 14 जणांवर कारवाई करत 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, थुंकीबहाद्दर, मास्कविना फिरणाऱ्या 22 हजार 370 जणांकडून कालपर्यंत 93 लाख 67 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.