Pimpri Corona news: महिन्याभरात दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा महापालिकेचा निर्धार

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. 1 मे पासून देशातील 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहिर केले आहे. त्यानुसार महिन्याभरात पिंपरी -चिंचवड शहरातील दहा लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि उपाययोजना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज, शुक्रवारी बैठक झाली.

महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील, भाजप शहराध्यक्ष- आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, उपमहापौर हिराबाई नानी उर्फ घुले,स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर तुषार हिंगे उपस्थित होते. या बैठकीत विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेकडून लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

केंद्र सरकारने 1 मे 2021 पासून 18 वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सध्यस्थितीला 45 वर्षांपुढील सुमारे 3 लाख नागरिकांचे यशस्वीपणे लसीकरण झाले आहे.

आगामी काळात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील बहुतांश नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. पुढील महिन्याभराच्या कालावधीत सुमारे 10 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यासाठी शहरात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त प्रभागनिहाय प्रत्येकी चार असे आणखीन 60 अतिरिक्त लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. नागरिकांना ने-आण करण्यासाठी रिक्षा वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगरसेवक व प्रशासन प्रतिनिधी यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून प्रतिकेंद्र 200 लोकांची नोंदणी करुन लसीकरण करण्यात येणार आहे.

सध्या शहराला दर दिवसा 18 ते 20 हजार लस उपलब्ध होतात. 1 मे पासून 40 ते 50 हजार लस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. लॉकडाऊन काळात या मोहिमेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच लसीकरण ठिकाणी गर्दी होवू नये, सुरळीतपणे लसीकरण व्हावे, यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.

या बैठकीमध्ये प्लाझ्मादान, रक्तदान, लसीकरण मोहीम याबाबत जनजागृती, समस्या निराकरण व उपाययोजना, शवदाहिन्या वाढविणे, ऑक्सिजनसाठी नियंत्रण टीम तयार करणे, शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करणे, वैद्यकीय सेवा पुरविताना लॉकडाऊनचे नियम पाळणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या कामांसंदर्भात प्रशासनाच्या मदतीला नगरसेवकांची टिम असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.