Pimpri News: महापालिकेकडून भाजी मंडईत कापडी पिशव्यांचे वाटप; आठ दिवस चालणार मोहिम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह स्वच्छता मोहिमे अंतर्गत कापडी पिशव्या वाटप मोहिमेमध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील भाजी मंडई/ व्यावसायिक ठिकाणे/ मार्केट या ठिकाणी 200 कापडी पिशव्यांचे सोमवारी (दि.17) वाटप करण्यात आले. कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यासाठी ही मोहिम पुढील 8 दिवस सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भाजी मंडई/ व्यावसायिक ठिकाणांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी सांगितले.

ज्या नागरिकांनी मार्केटमध्ये प्लास्टीक पिशवी आणली होती. त्यांना कापडी पिशवी देण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी कापडी पिशव्या मागून घेतल्या तर काहींनी प्लास्टिकच्या पिशव्या महापालिका कर्मचा-यांच्या हाती सोपवत कापडी पिशव्याचा आनंदाने स्वीकार केला.

कापडी पिशव्यांचे वाटप हा प्रातिनिधीक उपक्रम असून नागरिकांनी स्वत:च कापडी पिशव्या वापरण्याची सवय लावली पाहिजे. घरच्या घरी कापडी पिशव्या तयार करणे सोपे आहे. त्यामुळे दुकानदाराला प्लास्टीकची पिशवी मागण्यापेक्षा एक छोटी कापडी पिशवी सोबत नेली, तर दुकानदारालाही सवय लागेल आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी व्हायला मदत होईल’, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. सर्व क्षेत्रीय अधिकारी व सहाय्य आरोग्याधिकारी यांचे हस्ते क्षेत्रीय कार्यालयातील भाजी मंडईमध्ये कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.

प्रत्येकाने कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प करावा; महापौरांचे आवाहन

भाजीबाजारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आढळतो. भाजी विक्रेते प्लास्टिकच्या पिशवीतच भाजी आणि फळे देण्याला प्राधान्य देतात आणि ग्राहकही या पिशव्या सर्रास घरी घेऊन जातात. या पिशव्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे परिसर अस्वच्छ होतोच पण त्याचबरोबर पर्यावरणाची हानी होते. प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नाही. त्यावर उपाय म्हणून पालिकेने कापडी पिशव्या बनविल्या आहे. प्लास्टिक पिशव्या न वापरता प्रत्येकाने कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प करू या, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले.

प्लास्किटचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई

प्लास्टीक कचरा व्यवस्थापन प्रथम सुधारणा नियम अंतर्गत सन 2022 पर्यंत सिंगल युज प्लास्टीक वस्तुंना प्रतिबंधीत करण्याकरिता 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या आणि 120 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक कॅरीबॅगवर बंदी घालण्यात आली आहे. या अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरामध्ये सुरु आहे. यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास पहिला गुन्हा 5 हजार रुपये दंड, दुसरा गुन्हा 10 हजार रुपये दंड आणि तिसरा गुन्हा 25 हजार रुपये दंड आणि तीन महिने इतक्या मुदतीची कारावास असा दंड आहे. कोणत्याही व्यक्तीने प्लास्टिक व थर्माकोलचा वापर केल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.