Pimpri News : ड्यूटीवर गणवेश न घालणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना 20 रूपये दंड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान न केलेला आढळून आल्यास त्यांना त्या दिवशी 20 रूपये दंड आकारला जाणार आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कार्यालयीन शिस्तीचा भंग करणा-या या कर्मचा-यांवर संबंधित शाखाप्रमुखांनी कडक कारवाई करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील गणवेश देय कर्मचा-यांना महापालिकेकडून गणवेशासाठी रोख रक्कम तसेच धुलाई भत्ता देण्यात येतो. गणवेश देय कर्मचा-यांनी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी वेळोवेळी परिपत्रकाद्वारे सूचना केल्या आहेत.

या सूचना कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतात. तथापि, अनेक वेळा सूचना देऊनही तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करत नाहीत. ही बाब कार्यालयीन शिस्तीत अनुसरून नाही. त्याचा विपरीत परिणाम कार्यालयाच्या प्रतिमेवर होतो. गणवेश देय कर्मचारी महापालिकेचा गणवेश परिधान न केलेला आढळून आल्यास त्यांना शाखाप्रमुखांनी त्या दिवशी 20 रूपये दंड आकारावा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी 18 फेब्रुवारी 2009  रोजी दिले आहेत.

तसेच ज्या महिन्यामध्ये कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान केलेला नसेल. त्या महिन्यात मासिक बिलातून धुलाई भत्ता कपात करण्यात यावा, असेही निर्देश दिले आहेत. या सूचनांनुसार संबंधित शाखाप्रमुखांनी कारवाई करावी. वारंवार सूचना देऊनही कार्यालयीन शिस्तीचा भंग करणा-या कर्मचा-यांवर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.