Pimpri News : महापालिकेच्या सक्रिय क्षयरोग, कुष्ठरोग शोधमोहीम अभियानास सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत अती जोखमीच्या कार्यक्षेत्रात संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग निदान कार्यक्रमांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, चिंचवड येथे सक्रिय क्षयरोग शोध मोहीम, कुष्ठरोग शोध मोहीम आणि जनजागरण अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या हस्ते आज (मंगळवारी, दि. 1) करण्यात आले.

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. कमलाकर लष्करे, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानदेव साबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रुग्णालय प्रमुख डॉ. सुनिल जॉन, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. अंजली ढोणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

समाजातील निदान न झालेले कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण लवकरात लवकर शोधणे. संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने हे सीबीनॅट/ट्रयुनॅट मशिनव्दारे व एक्सरे तपासणी करणे. रुग्णांना त्वरीत मोफत औषधोपचार करणे. क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश आहे.

समाजातील सर्व क्षयरोग रुग्ण व कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेऊन निदान निश्चिती नंतर औषधोपचार त्वरीत सुरु करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासन निर्णयाप्रमाणे 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत ही शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतील अती जोखमीच्या कार्यक्षेत्रातील एकूण 4 लाख 49 हजार 750 लोकसंख्येची सर्व्हेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 89 हजार 950 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून या मोहीमेसाठी एकूण 257 टीम व 52 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.