Pimpri news: महापालिकेने लॉकडाऊन संपण्यापूर्वी  गरजूंना मदत करावी  – राहुल कलाटे

गरजूंना 3 हजारऐवजी 5 हजार रुपयांची मदत करावी

1

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने संचारबंदीच्या कालावधीत गरजूंना 3 हजार रुपये मदत देण्याची घोषणा करून नऊ दिवस उलटले आहेत. अजून मदतीचे कोणतेही नियोजन झालेले दिसत नाही. कष्टकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये. तत्काळ मदत देण्यास सुरुवात करावी. लॉकडाऊन संपण्यापूर्वी गरजूंना 3 हजार ऐवजी 5 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कलाटे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादूर्भाव राज्यात वाढू लागल्यानंतर राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी सरकारने लॉकडाऊन केले. हा निर्णय घेताना हातावरचे पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गाचा विचार त्यांनी करून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोरगरीबांसाठी हा निर्णय हितकारक आहे. राज्यसरकारने निर्णय घेऊन कोणाला मदत जाहीर करणार याविषयी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन केले आणि त्यानुसार मदतकार्य सुरू झाले आहे.

राज्याने निर्णय घेताच भाजपाची सत्ता असणाऱ्या पिंपरी-चिचंवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी कोणतेही नियोजन न करता, निर्णय जाहीर केला आहे. वास्तविक कोणतीही योजना जाहिर करताना त्याचे लाभार्थी निश्चित होणे गरजेचे असते. मदतीसाठी लागणारा कालावधीही निश्चित होणे आवश्यक होते. मात्र, योजना जाहीर होऊन नऊ दिवस झाले तरी अजून कोणतेही नियोजन सत्ताधाऱ्यांचे  झालेले दिसत नाही.

शहरातील रिक्षाचालक ( बॅचधारक ), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार  (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणा-यांवर उपासमारीची वेळ येवु नये म्हणून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला आहे. मात्र, अंमलबजावणी होणार कशी हा प्रश्न आहे.

_MPC_DIR_MPU_II

सर्व कष्टकरी वर्गाचा यात विचार करणे गरजेचे आहे. रिक्षाचालक ( बॅचधारक ), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार ( गटई कामगार ), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे चालक, जिम ट्रेनर यातील लाभार्थी ठरविणार कसे? रिक्षा चालकांना मदत व्हायला हवी.

बस चालकांना मदत व्हायला हवी. आज रोजी याबाबत कोणतीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये.सर्वांत महत्वाची बाब म्हणजे, याशिवाय शहरात घोषित आणि अघोषित 42 झोपडपट्टया आहेत. त्यात मोठयाप्रमाणावर कष्टकरी, कामगार वर्ग राहतो. तसेच वरील बहुतांशी घटक हे झोपडपट्टी धारक आहेत. खरे तर या दिवसात झोपडपट्टीतील नागरिकांना हात देणे गरजेचे आहे.

खरच लाभ द्यायची सत्ताधाऱ्यांची इच्छा असेल तर त्यामुळे झोपडपट्टी धारकांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यानुसार घरटी पाच हजार मदत करावी. तसेच छोटया चाळ वजा घरातही कष्टकरी राहतात. त्यांचीही माहिती संकलित करून मदत करणे गरजेचे आहे.

तसेच बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे गवंडी, इलेक्ट्रिशियन, घरांना रंग देणारे रंगारी यांच्यासह नंदीवाले, गोंधळी, भराडी, बँडवाले, वाजंत्री असे विविध लोककलावंत आणि चित्रकार, शिल्पकार, लेखक आणि कवी वास्तव्यास आहेत. त्यांनाही मदत द्यावी. केवळ योजना जाहीर न करता तीचा लाभ गरजूंना कसा होईल, या दृष्टीने विचार करायला हवा.

अशा प्रकारे मदत देणारी पिंपरी-चिंचवड राज्यामध्ये पहिलीच महापालिका ठरेल, अशी घोषणा सत्ताधारी भाजपाने केली आहे. खरे तर ही राजकीय घोषणा ठरू नये, यासाठी सर्व घटकांतील कष्टक-यांना व गरजूंना प्रत्येकी 3 हजार ऐवजी 5 हजार रुपये मदतीचे वाटप होणे गरजेचे आहे. लॉकडाऊन संपण्या अगोदर ही मदत गरीब कष्टकरी, गरजू  जनतेला  देण्यात यावी अशी मागणी गटनेते कलाटे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Show Comments (1)