Pimpri news: छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिनासाठी महापालिका देणार निधी; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ आहे. प्रतिवर्षी फाल्गून अमावस्येला संभाजी महाराजांचा बलिदान दिन अर्थात पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मदतनिधी देणार आहे. त्याला महासभेत मान्यता देण्यात आली. नगरसेवक विकास डोळस यांनी ही आग्रही मागणी केली होती.

तुळापूर येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. नगरसेवक विकास डोळस यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी करताना सुविधा उपलब्ध करण्याबाबत निधीअभावी अडचणी येते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ग्रामपंचायतला प्रतिवर्षी मदत करावी, अशी मागणी केली.

त्यामुळे पुण्यतिथीदिनी समाधी स्थळाच्या ठिकाणी मंडप व लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी, हार-फुले इत्यादी करिता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून 5 लाख रुपये प्रतिवर्षी देण्यात येणार आहेत.

माजी उपसरपंच मारुती शिवले म्हणाले की, स्व. अण्णासाहेब मगर यांनी पूर्वी बलिदान दिन आणि पुण्यतिथी साजरी करण्याबाबत मदत करण्याची सुरूवात केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा भाग हवेली तालुक्यात येतो. छत्रपती संभाजी महाराज देशवासीयांच्या अस्मितेचा विषय आहे. जिल्हा प्रशासनाकडून 1 लाख रुपयांचा निधी मिळतो.

मात्र, पुण्यतिथी दिनी तुळापूर येथे सुमारे दीड लाख शिवप्रेमी येत असतात. त्यांना जेवण, मंडप, स्वच्छतागृह, लाईट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी कमी पडतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने दरवर्षी आम्हाला ठराविक निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.