Pimpri News: कुत्रा व मांजराच्या दहनासाठी महापालिका आकारणार एक हजार रुपये शुल्क

एमपीसी न्यूज – मृत कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांच्या दहनासाठी त्यांच्या मालकांकडून महापालिका दहन शुल्क घेणार आहे. यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्याचे स्थायी समिती सभेने निश्चित केले असून त्यास मंजुरी देण्यात आली. या विषयाच्या अंतिम मान्यतेसाठी महापालिका सभेकडे शिफारस करण्यात आली.

यासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे 67 कोटी 49 लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने आज (बुधवारी) मान्यता दिली.

महापालिका हद्दीतील कुत्रा, मांजर या सारखे पाळीव प्राणी मृत झाल्यास त्यांचे दफन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे छोटे पाळीव प्राणी दफन भूमी कार्यान्वित आहे.

याठिकाणी प्राणी दहन मशीन सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी प्राण्यांचे दहन करण्याची कार्यवाही केली जाते. आता असे दहन करण्यासाठी त्या पाळीव प्राण्याच्या मालकाकडून दहन शुल्क घेतले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.